मराठी, गुजरातींबरोबरच उत्तर भारतीयांचा बोलबाला
By admin | Published: January 20, 2017 02:22 AM2017-01-20T02:22:54+5:302017-01-20T02:22:54+5:30
तीन प्रभाग मिळून तयार झालेल्या १०३ या प्रभागात मराठी मतदारांचा बोलबाला अधिक आहे.
मुंबई : तीन प्रभाग मिळून तयार झालेल्या १०३ या प्रभागात मराठी मतदारांचा बोलबाला अधिक आहे. तब्बल १४ हजार २४९ मराठी मतदार या प्रभागात आहेत. त्याचबरोबर गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्याही त्यांच्या खालोखाल आहे. त्यामुळे या मतदारांची मते मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच मूलभूत समस्यांबरोबरच पुनर्विकास प्रचाराचा मुद्दा असेल.
मुलुंड पश्चिमेकडील या प्रभागात एकूण ४४ हजार ५०४ मतदार आहेत. मराठी (१४,२४९ ), गुजराती (१३, १३१), उत्तर भारतीय (११,१९३), इतर (१,२७१) मतदारांचा समावेश आहे. यामध्ये निर्मल लाइफ, हेक्स्ट, मॅरेथॉन, छेडा पेट्रोलपंप, वीणानगर, वसंत आॅस्कर या विभागांचा समावेश तर भांडुप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा या विभागांचा यात भरणा आहे. ९८, ९९ आणि १०३ हे तीन प्रभाग मिळून १०३ हा प्रभाग बनविण्यात आला आहे. हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी होता. भाजपाच्या नगरसेविका येथून निवडून आल्या होत्या. गरीब व उच्चमध्यमवर्गीय मतदारांचा हा प्रभाग आहे. मात्र आता नव्या रचनेमुळे हा प्रभाग खुला झाल्यामुळे उमेदवारांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. भाजपाबहुल असलेल्या या वॉर्डमध्ये भाजपाचे गटनेते यांनी फिल्डिंग लावली आहे.
मूलभूत समस्यांबरोबरच पुनर्विकासाचा मुद्दा या भागातील प्रमुख समस्या ठरणार आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारीही रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवित आहेत. मराठीबरोबरच गुजराती व्यवस्थित असावी म्हणून इच्छुक उमेदवारांपैकी काहींनी गुजराती शिकण्यासाठी शिकवणी वर्गही लावले आहे. तिकीट मिळण्याची शाश्वती असलेल्या उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. कुठे वडापाव दिला जातोय तर कुठे खमण ढोकळ्याबरोबरच भेळपुरीचा बेत आखला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. (प्रतिनिधी)