उत्तर मुंबई मतदारसंघ : गोपाळांना रोखण्यास गोंविदाचा शोध, भाजपासाठी अनुकूल मतदारसंघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:05 AM2019-02-08T05:05:22+5:302019-02-08T05:05:42+5:30
भाजपाचे दिग्गज नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने सिनेअभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून निवडून आलेल्या राम नाईकांचा विजयरथ गोविंदामुळे रोखला गेला. आताही काँग्रेसला अशाच चमत्काराची गरज आहे.
- गौरीशंकर घाळे
साल २००४. चौदाव्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची देशपातळीवर चर्चा झाली. भाजपाचे दिग्गज नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने सिनेअभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून निवडून आलेल्या राम नाईकांचा विजयरथ गोविंदामुळे रोखला गेला. आताही काँग्रेसला अशाच चमत्काराची गरज आहे. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मतदारसंघावरील भाजपाची पकड सुटली नव्हती. २०१४ च्या मोदी लाटेत तर भाजपाने या मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्या पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तब्बल साडेचार लाखांच्या फरकाने काँग्रेसचे तेव्हाचे खासदार संजय निरुपम यांचा धुव्वा उडविला. त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उत्तर मुंबईतील सहापैकी चार जागांवर भाजपाचे कमळ फुलले. पुढे महापालिका निवडणुकीतही भाजपाचे २४ नगरसेवक या भागातून विजयी झाले. महापालिकेतील भाजपाच्या ८२ पैकी २४ नगरसेवक एकट्या उत्तर मुंबईतील आहेत. ही आकडेवारी या मतदारसंघावरील भाजपाची पकड सांगण्यास पुरेशीआहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी जवळपास नक्की आहे. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चारकोपचे आमदार योगेश सागर यांची नावे पुढे आली. पण, ती चर्चेपुरतीच. १९९२ साली नगरसेवक, पुढे मुंबईचे उपमहापौर, दोनवेळा आमदारकी आणि २०१४ साली खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेले गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा खासदारकीसाठी शड्डू ठोकून उभे आहेत. युती आणि आघाडीचे काहीही झाले तरी खासदार मीच असेन, असा शेट्टींचा दावा आहे.
एकीकडे शेट्टी आणिं त्यांची भाजपा पूर्ण तयारीत असताना काँग्रेसकडे मात्र उमेदवाराची वानवा आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. शेजारच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. पण भक्कम पक्षबांधणी केल्याने निरुपम यांनी उत्तर मुंबईतूनच निवडणूक लढवावी, अशी भूमिका मुंबई काँग्रेसमधील इतर नेत्यांनी घेतली आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून आपण सर्वत्र पक्ष मजबूत केला, हा निरुपम यांचा दावाच त्यांच्या वाटेतील अडथळा ठरत आहे. ‘पक्ष मजबूत केला, तर मग मतदारसंघातून पळ का काढताय? उत्तर मुंबईतून तुम्ही २००९ साली खासदार झाला होतात, अध्यक्षांनीच मतदारसंघ बदलला तर कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल’ या पक्षांतर्गत विरोधकांच्या या युक्तिवादापुढे निरुपम सध्या निरुत्तर आहेत.
काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या बैठकीतही संजय निरुपम यांना मनाजोगता कौल मिळाला नाही. त्यामुळे निरुपम ‘हायकमांड’च्या भरवशावर आहेत. निरुपम नाही, तर मग कोण, या प्रश्नाचेही काँग्रेसकडे उत्तर नाही. त्यामुळे गोविंदाचा भाचा असलेला कॉमेडियन कृष्णा अभिषेकपासून अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझहरुद्दिन वगैरे सेलिब्रेटींची नावे पुढे योत आहेत. एकूणच २००४ च्या गोविंदा चमत्काराप्रमाणे येत्या निवडणुकीतही काहीतरी चमत्कार घडेल, या आशेवर काँग्रेस कार्यकर्ते आहेत. तीन राज्यांतील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्ते काहीसे आशावादी दिसत असले तरी प्रबळ उमेदवारच नसल्याने उत्तर मुंबईत सध्या तरी ‘सब भूमी गोपाल की’ अशीच अवस्था आहे.
सध्याची परिस्थिती
युती फिसकटल्यास शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यादृष्टीने काम सुरू झाल्याचे चित्र नाही.
२०१४ साली प्रकाश सुर्वे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि आमदार बनले. त्यांच्या निमित्ताने जुने विरुद्ध नवे शिवसैनिक असा सुप्त संघर्ष या विभागात दिसत आहे.
बोरीवली, मालाड रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधा या शेट्टी यांच्यासाठी जमेच्या बाजू. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्याच्या मतदारांच्या मागणीवरही काम सुरू.
मतदारसंघ बदलासाठी संजय निरुपम यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे सध्या उमेदवार नसल्याची काँग्रेसची अवस्था आहे. परिणामी चांगली लढत देऊ शकेल, शकेल, अशा सेलिब्रिटींची नावे पक्षातील विविध गट पुढे करीत आहेत.
२०१४ मध्ये मिळालेली मते
6,64,004
गोपाळ शेट्टी
(भाजपा)
2,17,422
संजय निरुपम
(काँग्रेस)
32,364
सतीश जैन
(आप)
8,758
नोटा
5,506
कमलेश यादव
(सपा)