बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे; लवकरच अवतरणार थंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:55 AM2023-12-23T09:55:21+5:302023-12-23T10:00:05+5:30
ख्रिसमसच्या तोंडावर मुंबईतील हवेला पुन्हा प्रदुषणाचे ग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंंबई : गेल्या सहा दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, पुन्हा तापमानात वाढ झाली. आता ख्रिसमसनंतर मुंबईत थंडी पडेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभावही दिवसभर कायम राहिल्याने पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव राहिला. त्यामुळे समुद्री वाऱ्याबरोबर वाहून जाणारी प्रदूषके हवेत स्थिर राहिल्याने मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात बदल जाणवत आहेत. आठवड्याभरापूर्वी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले होते. त्यामुळे थंडीचा प्रभाव वाढला होता.
थंडीचा कडाका वाढेल
किमान तापमान २३ अंशांवर गेल्याने थंडी किंचित कमी झाली. या आठवड्यात किमान तापमान पुन्हा १९ अंशांवर घसरल्याने थंडी वाढली. आता किमान तापमान २१ अंश असून, उत्तरेकडे होणाऱ्या बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे वाहतील. त्यामुळे किमान तापमान २५ डिसेंबरनंतर १९ अंशांवर घसरेल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाले आहेत. मुंबईसह गुजरातमध्येही ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले आहे. मात्र, या वातावरणामुळे मोठ्या पावसाची शक्यता नाही. आर्द्रता वाढल्याने हवेत बदल झाला. शनिवारीही असेच ढगाळ वातावरण राहील.
- राजेश कपाडीया, वेगरिज ऑफ दी वेदर
मध्य महाराष्ट्र, गुजरात, मुंबईत किमान तापमानात सरासरी तुलनेत दोन डिग्रीने वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, गुजरात, मुंबईत सरासरीच्या खाली घटलेले कमाल तापमान आता सरासरीच्या पातळीवर पोहोचले आहे. म्हणजे कमाल तापमान वाढले आहे. हिवाळ्यात सकाळच्या वेळी कमी उंचीवर ढगांचे मळभ तयार होते. सूर्यकिरणे वर आली की, ढगाळ वातावरण निवळून पुन्हा सर्वत्र निरभ्रता येते.
- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ