नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा
By admin | Published: December 30, 2016 09:03 PM2016-12-30T21:03:22+5:302016-12-30T21:03:22+5:30
नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे. बँका आणि एटीएमसमोरील लोकांच्या रांगा कायम असून, व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला. ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुनिया पुढे म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले. तसेच मागील १ मार्च २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भाजपा आणि आरएसएसने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व आरएसएसने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी निर्णयापूर्वी काळ्या पैशातून संपत्ती खरेदी करून तो पैसा पांढरा केला आहे, असाही पुनिया यांनी गंभीर आरोप केला.
त्यामुळे सरकारने बँक खात्यातील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध हटवून प्रत्येकाच्या खात्यातील जमा रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, तसेच बीपीएल कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्यात यावेत. तसेच लहान दुकानदार आणि उद्योगांना प्राप्तिकर आणि विक्री करात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.