विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 07:38 IST2024-05-10T07:37:54+5:302024-05-10T07:38:08+5:30
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते.

विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष २००१ पासून सोबत काम करत आहेत. दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रित लढविल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे असून, यापुढेही आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय नव्हता
भाजपसोबत जाण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला होता, असे अजित पवार म्हणाले होते. माध्यमांनी या प्रश्नाबाबत छेडले असता शरद पवार म्हणाले, आमचा कोणताही निर्णय भाजपसोबत जाण्याचा नव्हता. आमची व भाजपची विचारधारा वेगळी आहे. आमच्यातील काही सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचे होते. मात्र, तो काही पक्षाचा निर्णय नव्हता.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम या तीन पक्षांचे मिळून सहा खासदार निवडून आले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याच्या टीकेवर, भाजपच्याच पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे ठरला होता? असा सवाल केला.