परदेशात नाही, इथेच! स्वयंपाक घर तेलंगणात; तर बैठक खोली महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:39 AM2022-12-15T07:39:19+5:302022-12-15T07:39:43+5:30
सीमावादात अडकलेल्या गावांची व्यथा, ना घर का, ना घाट का...अशी आहे अवस्था
- दीपक साबने
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात एक असेही घर आहे, त्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात आहे. सीमावादात अडकलेल्या १४ गावांपैकी महाराजगुडा या गावातील पवार कुटुंबीयांच्या या घराची सध्या चांगलीच चर्चा आहे. दहा खोल्यांचे हे घर अर्धे तेलंगणात आहे तर अर्धे महाराष्ट्रात आहे.
तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निर्धारित केली. ही सीमा गावाच्या मध्यभागातून गेल्यामुळे अर्धे गाव तेलंगणा आणि अर्धे गाव महाराष्ट्र राज्यात आले आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केवळ गावालाच विभागले नसून एका घरालाही विभागले आहे. पवार भावंडाचं घर विभागून चंदू देवसिंग पवार यांचे घर तेलंगणात तर उत्तम देवसिंग पवार यांचे महाराष्ट्रात आले आहे. विशेष म्हणजे, याच घरातील स्वयंपाक रूम तेलंगणात तर बैठक रूम महाराष्ट्रात आली आहे. या गावातील गणेश शत्रू जाधव यांच्या घराचा समोरचा भाग तेलंगणा आणि मागचा भाग महाराष्ट्रात आल्याचे गावकरी सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत आहेत.
तेलंगणा सरकारने दिले शेतीचे पट्टे
nतेलंगणा सरकारकडून काही जणांना शेतीचे पट्टे देऊन त्यावर लाभ देणेही सुरू केले आहे.
nतसेच भरीव विकासकामे केल्याचेही गावकरी सांगतात व विविध योजनांचा लाभही नागरिक घेताना दिसून येतात.
nकाही जणांचा तेलंगणाकडे जाण्याचा कल आहे. मात्र जे सरकार शेतीचे पट्टे देतील तिथे राहू, असेही गावकरी सांगतात.