धर्माला नव्हे, तर शोषणाला विरोध
By admin | Published: May 21, 2016 12:49 AM2016-05-21T00:49:58+5:302016-05-21T00:49:58+5:30
विचारांच्या मारेकरांनी या देशात प्रगती केली आहे. अंनिसचा देवाला किंवा धर्माला विरोध नाही
पुणे : विचारांच्या मारेकरांनी या देशात प्रगती केली आहे. अंनिसचा देवाला किंवा धर्माला विरोध नाही, तर यांच्या नावावर करण्यात येणाऱ्या शोषणाला विरोध आहे. लोक अंनिसबद्दल समाजात गैरसमज पसरवत आहेत, अशी खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
‘अनंत तरंग’ या डॉ. अनंता कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन शुक्रवारी डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले, त्या वेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल गांधी, आशा खाडिलकर उपस्थित होत्या.
डॉ. दाभोलकर म्हणाले, की आजूबाजूचे सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे व समाजातील विद्रूप वास्तवाबद्दल जागृती करण्याचे, त्यावर फुंकर घालण्याचं काम कवीचे असावे. अंनिस लोकांना प्रश्न विचारायला शिकवते; त्याचबरोबर धर्माची चिकित्सा करण्याचे काम समिती करते. खऱ्या धर्मश्रद्धांना चिकित्सेचे वावडे नसते. योग्य विचार समाजात पेरत राहिले तर समाज नक्कीच बदलतो. आधुनिक विज्ञानाचा वापर करून आजकालचे बाबा लोकांचे शोषण करीत आहेत आणि अशांना लोक बळी पडत आहेत.
डॉ. अनिल अवचट यांनी ‘अनंत तरंग’ या काव्यसंग्रहाचे विश्लेषण केले. ते म्हणाले, ‘‘खरं, मवाळ, थोडक्यात व रसाळ असं साहित्य असायला हवं. आपण गंभीरतेने साहित्याला सामोरे जाणे गरजेचे आहे.’’
वर्षा महाजनी यांनी सूत्रसंचालन केलं. (प्रतिनिधी)