वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:14 IST2025-04-03T13:07:03+5:302025-04-03T13:14:22+5:30

वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे असं त्यांनी म्हटलं.

Not against the Waqf Bill, but against the corruption in it; Uddhav Thackeray attacks BJP and Eknath Shinde | वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई - वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसं सहन करतील. वक्फ बोर्डात काही अफरातफर सुरू असेल तर नक्कीच त्यावर पायबंद घातला पाहिजे. देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू मुस्लीम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेना आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी कधीही सगळे मुस्लीम देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलं नाही. आजही आमच्याकडे शाबीरभाई शेखसारखे कडवट मुस्लीम कार्यकर्ते आहेत. जर तुम्ही हिंदुत्व असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे असं त्यांनी म्हटलं.

केवळ जमिनीसाठी विधेयक आणलं...

तसेच वक्फ सुधारणा विधेयकात ज्या दुरुस्त्या सूचवल्या त्यावरून तुम्ही मुस्लीम धार्जिणे आहात असं दाखवले जात होते. भाजपाचे नेते अमित शाह, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी ज्याप्रकारे मुस्लीम समाजाची भूमिका मांडली. गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुनचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपाचं धोरण आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असं बोलले जाते, वक्फ सुधारणा विधेयकाचं हिंदुत्वाशी काय देणे घेणे? मुस्लिमांवर बोलायचे, सौगात ए मोदी वाटायचे हे केले जाते. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर भाजपाची नजर आहे. आज मुस्लिमांवर जसे केले तर हिंदूंवरही होणार आहे. केवळ जमिनीसाठी हे विधेयक आणले. आम्ही विधेयकाला विरोध केला नाही तर भ्रष्टाचाराला केला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, देशाच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्यावर बोलायला हवं होते. अमेरिकेने भारतावर जो टॅरिफ लावला आहे त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. अमेरिकेने जे धोरण राबवले त्यावर भारताची भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवी. अमेरिकेने जो टॅक्स लावला तो हिंदू मुस्लिमांवर लावला नाही. हे टॅरिफ देशावर लावले आहे. त्यामुळे यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. 

भाजपा घेतंय मुस्लिमांची बाजू

जिन्नालाही लाजवेल अशी भाषणे भाजपा नेत्यांनी संसदेत केली. रामनवमी, हनुमान जयंतीला गरीब हिंदूंना काय वाटले का, मुसलमानांना सौगात ए मोदी वाटली जाते. मुस्लिमांची बाजू भाजपा घेतंय त्यामुळे हिंदूनी जागं व्हायला हवे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  

Web Title: Not against the Waqf Bill, but against the corruption in it; Uddhav Thackeray attacks BJP and Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.