सर्वच विवाहपूर्व लैंगिक संबंध बलात्कार नाही
By admin | Published: January 23, 2017 04:15 AM2017-01-23T04:15:33+5:302017-01-23T04:15:33+5:30
विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या लैंगिक संबंधांना प्रत्येक वेळी बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने
मुंबई : विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेल्या लैंगिक संबंधांना प्रत्येक वेळी बलात्कार म्हणता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. लग्नापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या सुशिक्षित मुलीने तिने केलेल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, नंतर बलात्काराचा आरोप करू नये, असेही न्यायालायने स्पष्ट केले.
एका मुलीने तिच्या प्रेमभंगानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात या २१ वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना, न्या. मृदुला भटकर यांनी हे मत नोंदवले.
या तरुणाने लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त केले होते, असा दावा या मुलीने केला होता.
न्यायमूर्ती मृदुला भटकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना स्पष्ट केले की, लैंगिक संबंधांसाठी फसवून संमती मिळवली असेल तर हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मात्र, अशा प्रकारे प्रलोभन दाखवून संबंधित मुलीला उद्युक्त केले गेले, यासाठी ठोस पुरावा असायला हवा. मात्र, या प्रकरणात लग्नाचे वचन हेच कारण लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणारे ठरले, असे म्हणता येणार नाही.
संबंधांत तणाव आल्यानंतर किंवा ते संबंध संपल्यानंतर अशा प्रकरणांत गु्न्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठतेने पाहायला हवे. आधुनिक युगात अनेक प्रलोभनांपैकी लैंगिक संबंधांचेही प्रलोभन युवापिढीसमोर आहे. मात्र अशा संबंधांवेळी मुलींनी त्यांची जबाबदारी नाकारू नये, असेही त्यांनी नमुद केले. (प्रतिनिधी)