आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:45 PM2022-07-10T12:45:44+5:302022-07-10T12:47:10+5:30
Abdul Sattar : बंडानंतर अब्दुल सत्तार आपल्या मतदार संघात जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात आमदार अब्दुल सत्तार सुद्धा होते. या बंडानंतर अब्दुल सत्तार आपल्या सिल्लोड मतदार संघात जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
अब्दुल सत्तार म्हणाले, "मी अजून मतदारसंघात गेलो नाही, पण जिल्ह्यात आलो आहे. विशेष म्हणजे काही अनेक वर्षांची कामे राहिली होती. ती सर्व मुख्यमंत्र्यांकडे दीड-दोन वर्षांपासून खोळंबली होती, ती सर्व मार्गी लागून आलो. आता मतदार संघात जात आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही, तेवढा या चार दिवसांत मिळाला आहे."
याचबरोबर, अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाबाबत सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, "खरं म्हणजे मला कॅबिनेट सुद्धा नाही आणि राज्यमंत्रीपद सुद्धा नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात, किती खाती येतात, त्याप्रमाणे पुढील रुपरेषा आणि दिशा ठरविण्यात येईल. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. माझ्याकडे सध्या खूप मोठे पद आहे, ते म्हणजे एका कार्यकर्त्याचे पद, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. शिवसेनेत बंड पुकारलेल्या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला होता. या मुद्द्यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आईची शपथ घेऊन सांगावे की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. असा थेट सवाल अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना केला आहे.