मनासारखे मानसशास्त्रज्ञ न लाभल्याने कामगिरीवर परिणाम : ऑलिम्पियन राही सरनोबतची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:57 IST2019-07-27T13:53:40+5:302019-07-27T13:57:54+5:30
मानसशास्त्रज्ञांची देशात कमतरता नाही. परंतु, हवे तसे मानसशास्त्रज्ञ आपल्या नेमबाजांना मिळत नाही..

मनासारखे मानसशास्त्रज्ञ न लाभल्याने कामगिरीवर परिणाम : ऑलिम्पियन राही सरनोबतची खंत
पुणे : नेमबाजी हा पूर्णत: मानसिकतेचा खेळ आहे, हे ऑलिम्पिकमधील अनुभवातून मला चांगले लक्षात आले. या खेळात यश मिळविण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रज्ञांची देशात कमतरता नाही. परंतु, हवे तसे मानसशास्त्रज्ञ आपल्या नेमबाजांना मिळत नाही, यामुळे कामगिरीवर परिणाम होतो, अशी खंत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने शुक्रवारी व्यक्त केली.
आयएसएसएफ विश्वचषकातील २ सुवर्णपदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अनेक पदके जिंकून दिलेल्या राहीचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ऑलिम्पिक तयारीविषयी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी राही म्हणाली, ‘‘नेमबाजीमध्ये प्रत्यक्ष नेम साधताना खेळाडूची मानसिकता कशी आहे, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. खेळाडूंची मानसिकता कायम उच्च दर्जाची राहावीख यासाठी चांगला मानसशास्त्रज्ञ त्याच्यासोबत असणे अनिवार्य आहे. नेमबाजाला खेळाच्या प्रशिक्षणासोबतच मानसिकतेचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.’’
२०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी २०१७ पासून सुरू केली आहे. यासाठी जर्मन प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेत आहे. कारकिर्दीतील हे दुसरे ऑलिम्पिक असल्याने अनुभवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ऑलिम्पिकचा दबाव पेलण्याचे प्रमुख आव्हान खेळाडूंसमोर असते, असेही राहीने नमूद केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
.......
‘राष्ट्रकुल’मधून नेमबाजी वगळल्याचा फटका भारताला बसणार
राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळण्यात आला आहे. आजवरचा स्पर्धा इतिहास बघता भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीतून मिळतात. त्यामुळे यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याच्या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. यामुळे भारताची पदकसंख्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. ‘राष्ट्रकुल’मधील इतर देशांनी त्यांचे हित पाहून हा निर्णय घेतला आहे. भारताच्या दृष्टीने मात्र हा निर्णय नुकसानकारक आहे, असेही राहीने सांगितले.