वाद टाळण्यासाठी नको पुतळे वा झेंडे !
By Admin | Published: August 23, 2016 05:45 AM2016-08-23T05:45:20+5:302016-08-23T05:45:20+5:30
गावात जातीयतेला थारा नाही’ असा फलक असलेल्या अंबुलगा गावातील नागरिकांनी सोमवारी आणखी एक आदर्श घालून दिला
माधव पिटले,
अंबुलगा (जि. लातूर)- गावच्या वेशीवरच ‘या गावात जातीयतेला थारा नाही’ असा फलक असलेल्या अंबुलगा गावातील नागरिकांनी सोमवारी आणखी एक आदर्श घालून दिला. वाद टाळण्यासाठी गावात ना कुठला पुतळा, ना कुठला झेंडा, असा ठरावच या ग्रामस्थांनी घेतला.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा हे दहा हजार लोकवस्तीचे गाव. १९६५पासून गावाला १३ सदस्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचक्रोशीत आर्यसमाजी गाव म्हणून अंबुलग्याची ख्याती आहे. गावात कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसविलेला नाही. महापुरुषांची जयंती आली की अनुयायी चौका-चौकात झेंडे लावायचे. परंतु सोमवारी झालेल्या ग्रामसभेनंतर त्यालाही बंदी घालण्यात आली आहे.
पाचशेहून अधिक लोक या ग्रामसभेला हजर होते. विकासाच्या नावाखाली पुतळे उभारण्याचे प्रकार घडू नयेत. सहा महिन्यांपूर्वी गावात झेंडा लावण्यावरून तणाव निर्माण झाला होता. अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
>जातीपातीच्या नावावर चौक कशाला?
गावात यापूर्वी विविध चौकांच्या नामकरणाची मागणी पुढे आली होती. परंतु सोमवारच्या सभेत गावातील ज्येष्ठांनी आपले गाव आर्यसमाजी आहे, आपल्या गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, त्यामुळे जाती-पातीच्या नावावर चौक वाटून घेऊन गावात वाद येऊ नये यासाठी हा ठराव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. याला सर्वांनीच एकमुखी पाठिंबा दिला.
गावात सामाजिक शांतता व सर्वधर्मसमभाव वाढीस लागावा, यासाठी काही उपाययोजना करायला हवी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गावात यापुढे कुठल्याही महापुरुषाचा पुतळा उभारू दिला जाणार नाही; तसेच एकही ध्वज लावू दिला जाणार नाही, असा ठराव ग्रामसेवक आर. डी. वाघमारे यांनी मांडला होता.