घटस्फोट मिळत नाही म्हणून मुंबईच्या जावयाचा चाकूहल्ला, सासू ठार, पत्नी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:23 PM2018-03-23T12:23:37+5:302018-03-23T12:27:34+5:30
पत्नीसोबत घटस्फोट मिळत नाही म्हणून माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मुंबईच्या जावयाने सासूसह पत्नीवर चाकूने सपासप पाच वार केले. यामध्ये सासू रंजना भोसले (वय ५५) या जागीच मृत्यू पावल्या तर पत्नीही गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. हत्या केल्यांनतर आरोपी गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.
म्हसवड : पत्नीसोबत घटस्फोट मिळत नाही म्हणून माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मुंबईच्या जावयाने सासूसह पत्नीवर चाकूने सपासप पाच वार केले. यामध्ये सासू रंजना भोसले (वय ५५) या जागीच मृत्यू पावल्या तर पत्नीही गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. हत्या केल्यांनतर आरोपी गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.
आबासो बबन काटकर (वय ४०) असे खुनाचा आरोप असलेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरवणे येथील आबासो काटकर हा ठाणे येथील दिवा परिसरात पत्नी वैशाली आणि दोन लहान मुलांसह राहत आहे. तो बीएसटीत मेकॅनिकल विभागात नोकरी करत आहे. पत्नी वैशाली व त्यांच्यात काही वर्षे सातत्याने वाद होत होता.
पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने वैशाली माण तालुक्यातील कुकुडवाड येथे माहेरी आली होतीे. त्यानंतर गुरुवारी आबासो काटकर हा सासरवाडीत गेला. घटस्फोट मिळावा म्हणूून त्याने सासू व पत्नीसोबत भांडण सुरू केले.
याच दरम्यान आबासो याने सासू रंजना भोसले यांच्यासह पत्नी वैशालीवरही चाकूने सपासप वार केले. जबडा, मान, छाती अन् पोट या ठिकाणी जखमा झाल्याने सासू जागीच मृत्यू पावली. तर पत्नी वैशालीही गंभीर जखमी झाली.
यावेळी त्यांना वाचविण्यास आलेल्या पूनम भोसले या भावजयीलाही त्याने ढकलून दिले. त्यानंतर तेथून तो पळून गेला. तसेच हत्या केल्यांनतर तो गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.
या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी आरोपी आबासो काटकर याला गावच्या रस्त्यावर तत्काळ अटक केली. म्हसवड पोलीस ठाण्यात पूनम भोसले या भावजयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, म्हसवड येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.