भाजपाचा नव्हे; साम, दाम, दंड, भेदाचा विजय : चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:24 AM2018-12-11T02:24:00+5:302018-12-11T02:24:28+5:30
धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपाचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई : राज्यपातळीवर भारतीय जनता पार्टीने गेली चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नैतिकता बासनात गुंडाळून ठेवण्याची प्रक्रिया कायम ठेवली आहे. दुमार्गाने मिळवलेले धन म्हणजे दुर्योधन आणि अनैतिक पद्धतीने चालवलेले शासन
म्हणजेच दु:शासन याच्या माध्यमातून लोकशाहीचे वस्त्रहरण सातत्याने केले जात आहे. धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपाचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
खा. चव्हाण म्हणाले, पालघर लोकसभा निवडणुकीत स्वमुखातूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपाची रणनिती स्पष्ट केलेली आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधिकृतपणे लक्ष्मी दर्शनास मान्यता दिलेली आहे. गुंडाना पक्ष प्रवेश, इतर पक्षातील लोकांना अमिषे दाखवून, भीती दाखवून फोडणे, पैशांचा खुलेआम वापर आणि निवडणूक यंत्रणेला धाब्यावर बसवणे. या सर्व गैर प्रकारातूनच विजयाचा फॉर्म्युला भाजपाने तयार केला आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रात काँग्रेस प्रमुख पक्ष नाही.
या दोन्ही शहरातील विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने गेल्या पंधरा वर्षापासून आघाडीतील मित्र पक्षांसाठी सोडलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे, असे असले तरीही काँग्रेस उमेदवार व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धनशक्तीचा निकराने विरोध केला आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या या कौरवनीतीचा पाडाव जनताच करेल, असे ते म्हणाले.