बुलेट नव्हे, बॅलेट चालविणार

By admin | Published: October 14, 2014 12:57 AM2014-10-14T00:57:19+5:302014-10-14T00:57:19+5:30

सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी

Not a bullet, run a ballot | बुलेट नव्हे, बॅलेट चालविणार

बुलेट नव्हे, बॅलेट चालविणार

Next

आत्मसमर्पित नक्षलवादी : चार महिलांसह २५ जणांना ओळखपत्र दिले
गडचिरोली : सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २५ आत्मसमर्पित नक्षल्यांना भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र उपलब्ध करून दिले आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६२ आत्मसमर्पित नक्षल्यांनी मतदान केले होते. राज्यात येत्या १५ आॅक्टोबर २०१४ रोजी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असा फतवा नक्षल्यांनी काढल्यानंतर त्यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांनी नक्षल्यांना घरचा आहेर दिला आहे. बंदुकीच्या बळावर सशस्त्र क्रांतीची भाषा करणाऱ्या आणि भारतीय राजसत्तेला आव्हान देणाऱ्या नक्षल्यांना लोकशाहीचे महत्त्व कळले आहे. १५ ते २० वर्षे नक्षल चळवळीत काम केल्यानंतर या चळवळीचा फोलपणा दलम सदस्यांच्या लक्षात आला आहे.
राजसत्तेचे केवळ दिवास्वप्न दाखवून बंदूक आणि हिंसेच्या बळावर सामान्य आदिवासींची हत्या करण्यालाच या चळवळीने प्राधान्य दिले आहे. विचारहीन असलेल्या या चळवळीत होणारी कुचंबना, आरोग्याच्या समस्या, सदैव भटकंती, अंतर्गत घुसमट आणि कायम मृत्यूचे भय यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी दलम सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
एकीकडे आत्मसमर्पित नक्षलवादी लोकशाहीवर विश्वास दाखवून मतदानात भाग घेत असताना सामान्य नागरिकांनीही नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Not a bullet, run a ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.