उसाचे बिलच दिले नाही!
By Admin | Published: June 13, 2016 01:34 AM2016-06-13T01:34:44+5:302016-06-13T01:34:44+5:30
शेतकऱ्याला खासगी साखर कारखान्यानेही गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतील पारवडी येथे समोर आला
बारामती : दुष्काळाने जेरीस आलेल्या शेतकऱ्याला खासगी साखर कारखान्यानेही गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतील पारवडी येथे समोर आला आहे. जानेवारी महिन्यात ऊस तोडून नेऊनदेखील अद्याप येथील शेतकऱ्यांना उसाचे बिलच मिळाले नाही. कारखान्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याशी संपर्क होत नसल्याने पारवडीतील जवळपास ५० शेतकरी हतबल झाले आहेत. साखर आयुक्तांनी तातडीने या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील रत्नपुरी करकंब येथील विजय शुगर या खासगी साखर कारखान्याने ही फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जानेवारी २०१६ मध्ये पारवडी येथे कारखान्याच्या ऊसतोडीच्या टोळ्या आल्या होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाला पाणी कमी पडत होते, त्यात परिसरातील साखर कारखान्यांकडून वेळेत उसाला तोड बसत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला. जवळपास ५० शेतकऱ्यांचा ३ हजार ५०० टन ऊस तोडून नेला; परंतु अद्याप या उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
फसवणूक झालेले बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उसाच्या येणाऱ्या उत्पन्नावरच या शेतकऱ्यांचा घरखर्च चालतो. मात्र, ७ महिने पैसे मिळाले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी कारखान्याच्या चिटबॉयच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, ‘माझाच पगार कारखान्याने दिला नाही. त्यामुळे मी तुम्हाला काय मदत करणार,’ असे उत्तर मिळाले. काही शेतकऱ्यांनी थेट कारखान्यावर जाऊनच याबाबत चौकशी केली असता. कारखान्याचे कार्यालय बंद होते. त्याठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी शेतकऱ्यांना भेटला नाही.
झालेल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. घरखर्च, दवाखाना यासाठी खासगी सावकारांकडून १० टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. तर, बँकेचे नवे-जुने करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे पुढील हंगामाच्या खर्चासाठीही भांडवल राहिले नसल्याने शेतकऱ्यांवर उपजीविकेसाठी बारामती एमआयडीसीमध्ये मजुरी करण्याची वेळ आली आहे.
(प्रतिनिधी)
>माझ्या मुलीचे लग्न ठरले होते. ऊस लवकर गेला, तर उसाच्या पैशातून मुलीचे लग्न करता येईल. या आशेवर माझा ऊस दिला. ऊस देतेवेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत उसाचे बिल मिळेल, असे सांगितले होते. एप्रिल महिन्यामध्ये मुलीचे लग्न जवळ आल्याने मी बिल मागण्यासाठी कारखान्यावर गेलो असता, कोणताही अधिकारी भेटला नाही. बिलही मिळाले नाही. लग्नासाठी खासगी सावकाराकडून १० टक्के व्याजाने पैसे घ्यावे लागले.
- प्रकाश दामू आटोळे, शेतकरी
>गावातील जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी ऊस दिला. १५ दिवसांमध्ये उसाचे बिल मिळेल, असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. माझ्या आईच्या गंभीर आजारावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी उसाचे बिल लवकर मिळेल, या आशेवर मी कारखान्याला ऊस दिला. परंतु अद्याप बिल मिळाले नाही. सध्या खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन आईवर उपचार करावे लागत आहेत.
- विठ्ठल बाळासाहेब बेंगारे (शेतकरी)