योगायोग नव्हे, प्रशासनाचा ‘योग’
By admin | Published: February 9, 2015 01:01 AM2015-02-09T01:01:10+5:302015-02-09T01:01:10+5:30
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असा एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील ससेगावात घडला आहे. या गावातील ९० टक्के लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा योगायोग नाही
अख्ख्या गावाचा ‘बर्थ डे’ एकाच दिवशी ! : ७० घरांच्या ससेगावची अशीही ओळख
मंगेश व्यवहारे - नागपूर
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असा एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील ससेगावात घडला आहे. या गावातील ९० टक्के लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा योगायोग नाही तर प्रशासनाने घडवून आणलेला हा योग आहे.
शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर वसलेले विमुक्त भटक्या जमातीतील गोपाळ समाजाचे हे गाव. येथे ७० घरांच्या लोकवस्तीत जवळपास २५० लोक राहतात. शिक्षणाचा फारसा लवलेश नाही. पूर्वी हे लोक शहरात जाऊन शारीरिक कसरती दाखवून उदरनिर्वाह करायचे. परंतु आता हा व्यवसाय चालत नसल्याने, हे लोक आता मजुरी करून पोट भरतात. जवळपास ५० वर्षांपासून हे लोक या गावात राहतात. येथील सर्व नागरिक दारिद्र्यरेषेखालील आहेत़ त्यामुळे समाज, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही या गावाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र जन्मतारखेमुळे सध्या हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे. प्रशासनाने या गावकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आधार कार्डवर ९० टक्के लोकांचा जन्म एकाच दिवशी झाल्याचे दिसते. गावातील प्रत्येकाचा जन्म १ जानेवारीला झाला असून, वर्ष मात्र वेगवेगळे आहे. या गावातील बाबाराव वाघाडे यांच्या घरी सहा लोकांचे कुटुंब आहे. बाबाराव घरातील ज्येष्ठ असून, त्यांना मुलगा, सून आणि दोन नातू आहेत. आधार कार्डवर या सर्वांची जन्मतारीख ही १ जानेवारी आहे. बाबारावसारखेच रूपचंद वाघाडे, गंगुबाई सोनवणे, किसन जाधव, अशोक सोनवणे यांच्याही कुटुंबातील सदस्यांची जन्मतारीख १ जानेवारीच आहे. आधार कार्ड बनवून देणाऱ्यांनी जन्मतारखेत केलेला घोळ उघड झाल्याने, या गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.
असा झाला घोळ
सरकारने नागरिकत्वाचा दाखला म्हणून प्रत्येकाचे आधार कार्ड बनवून दिले. या गावातही आधार कार्डचे शिबिर लागले होते. गावातील अनेकांकडे जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नाही. मात्र त्यांना आपले वय किती हे माहीत आहे. हे शिबिर १ जानेवारीला लागले होते. त्यामुळे संगणक आॅपरेटरने आधार कार्डचा फॉर्म भरताना प्रत्येकाची जन्मतारीख १ जानेवारी टाकून त्यांनी सांगितलेल्या वयानुसार वर्ष टाकून दिले आणि १ जानेवारीचे अधिकृत आधार कार्ड त्यांना उपलब्ध करून दिले. या गावातील मुलांचे जन्मतारखेचे दाखले उपलब्ध आहेत परंतु हे दाखले दाखवूनही त्यांच्या जन्मतारखा काही बदलल्या नाहीत़
काय म्हणता, आश्चर्यच आहे!
यासंदर्भात स्थानिक आमदार सुधीर पारवे यांना विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात तलाठ्याकडून माहिती घेऊन हा प्रकार नेमका कसा घडला याची विचारणा केली. योग्य पद्धतीने आधार कार्ड देण्यासाठी पुन्हा शिबिर आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कंपनीने गांभीर्याने काम केले नाही
सरकारने आधार कार्डची योजना राबविताना नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व दस्तऐवजांचे एक मल्टिपल डॉक्युमेंट आधार कार्ड राहील असे सांगितले होते. हे आधार कार्ड नागरिकांचे ओळखपत्र, नागरिकत्वाचा दाखला राहणार होते. देशभरातील १२० कोटी जनतेला आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे काम सरकारने खाजगी कंपन्यांना दिले होते. या कंपन्यांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट बनविताना गांभिर्याने काम केले नसल्याचे दिसते. आज भटक्या समाजाजवळ कागदपत्र नसल्याने त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. सरकारने आधार कार्ड देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अशा कारभारामुळे तोही फोल ठरताना दिसतो आहे.
अॅड. पराग उके, सामाजिक कार्यकर्ते