दिग्दर्शक नव्हे; निर्माता करतो ‘कास्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:31 AM2018-06-15T01:31:40+5:302018-06-15T01:31:40+5:30
नाटकांच्या नटांचे ‘कास्टिंग’ दिग्दर्शकाच्या हाती नव्हे; तर निर्मात्याच्या हाती असल्याचे युवा दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने व्यासपीठावरून सांगितले आणि त्यावर स्वत: एक नाट्यनिर्माता असलेल्या प्रसाद कांबळी यांनी प्रेक्षागृहातून टाळ्या वाजवून त्याला दिलेली दाद, हा या परिसंवादाचा ‘हायलाईट’ ठरला.
- राज चिंचणकर
मुंबई : नाटकांच्या नटांचे ‘कास्टिंग’ दिग्दर्शकाच्या हाती नव्हे; तर निर्मात्याच्या हाती असल्याचे युवा दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने व्यासपीठावरून सांगितले आणि त्यावर स्वत: एक नाट्यनिर्माता असलेल्या प्रसाद कांबळी यांनी प्रेक्षागृहातून टाळ्या वाजवून त्याला दिलेली दाद, हा या परिसंवादाचा ‘हायलाईट’ ठरला.
नाट्य संमेलनात विविध परिसंवादांची आखणी केलेली असते; मात्र ९८वे नाट्य संमेलन त्याला अपवाद ठरले. या नाट्य संमेलनात एकुलता एक परिसंवाद ठेवण्यात आला आणि तो म्हणजे ‘सांस्कृतिक आबादुबी’! या परिसंवादात जुन्या आणि नव्या पिढीच्या नाट्य दिग्दर्शकांनी एकूणच नाट्यसृष्टीविषयी ऊहापोह केला. नाटकांशी संबंधित विविध प्रश्न या वेळी ऐरणीवर आले.
जितेंद्र जोशी व केदार शिंदे यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने, या वेळी तिथे उपस्थित असलेल्या नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांकडून नाट्यसृष्टीच्या भल्याविषयी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. ‘विनोदी नाटके विरुद्ध गंभीर नाटके’, ‘व्यावसायिक नाटके विरुद्ध प्रायोगिक नाटके’ अशा काही मुद्द्यांभोवती हा परिसंवाद अधिक वाहावत गेला.
डॉ. जब्बार पटेल, पुरुषोत्तम बेर्डे, प्रतिमा जोशी, अद्वैत दादरकर, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, देवेंद्र पेम, संतोष पवार, केदार शिंदे, प्रताप फड व प्राजक्त देशमुख यांना या परिसंवादात हृषीकेश जोशी व जितेंद्र जोशी यांनी बोलते केले. दिग्दर्शकांच्या नजरेतून रंगलेल्या या परिसंवादातून अनेक मुद्दे बाहेर आले; परंतु हा परिसंवाद सुसूत्रीकरणाच्या अभावी बराच लांबला. रसिकांनी मात्र या परिसंवादाला मोठी गर्दी केली होती.
‘राज’कीय टोल्याचा असाही ‘प्रसाद’...!
भव्यदिव्यपणाची कास धरत रंगभूमीवर अलीकडेच अवतरलेल्या ‘हॅम्लेट’ या नाटकाच्या विरोधात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी गेल्याच महिन्यात रणशिंग फुंकले होते़ ९८ व्या नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, मराठी नाटकाला भव्यता द्या, असे सांगत प्रसाद कांबळी यांना त्यांच्याच उपस्थितीत टोला लगावल्याची चर्चा आता नाट्यसंमेलनस्थळी सुरू झाली आहे.
‘मुघल ए आझम’ या नाटकाचे ५ हजार रुपयांचे तिकीट काढून लोक हे नाटक बघायला जातात; मग मराठी नाटकांनी चढे तिकीट दर लावले, तर मराठी माणूस का नाही येणार नाटकांना, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मराठी नाट्यरसिकांची बोलती
बंद केल्याचे पडसाद नाट्यसंमेलनस्थळी उमटले आहेत.
डॉ. जब्बार पटेल
पडदा उघडतो, लाईट्स पडतात आणि तुमची परीक्षा सुरू होते. नाटक कुठलेही असो; प्रत्येक प्रकारच्या नाटकाचा आदर केला गेला पाहिजे. १९८४मध्ये मी शेवटचे नाटक केले असले; तरी आता एक नवीन नाटक मला मिळाले आहे आणि ते मी करणार आहे.
केदार शिंदे
विनोदी नाटकांकडे कधी कुणी गंभीरपणे पाहिलेच नाही. पण आम्हाला जे करावेसे वाटले, ते आम्ही केले. आमच्यामुळे अनेक गंभीर निर्माते हसायला लागले आहेत. निर्माते शिवाजी मंदिरची जागा लक्षात घेऊनच सेट उभारतात. मग नाटक मोठे कसे होणार?
संतोष पवार
गंभीर नाटक करणाऱ्यांना कुणी असे विचारत नाही, की तुम्ही विनोदी नाटक का केले नाही म्हणून! आम्ही विनोदी नाटके करतो़
पुरुषोत्तम बेर्डे
मी सेलिब्रिटींना घेऊन नाटके केलेली नाहीत. नाट्यक्षेत्रात कोणत्याही ‘गॉडफादर’ची वाट न पाहता, थेट नाटक करायला उडी घेतली पाहिजे. ही सांस्कृतिक ‘आबादुबी’ असली; तरी आनंदाच्या चेंडूने आम्ही ती झोडपत आहोत.
प्रतिमा कुलकर्णी
जेव्हा एखादा नट नाटक गांभीर्याने घेत नसेल; तर प्रेक्षकांनी तरी ते नाटक गांभीर्याने का बघावे?
चिन्मय मांडलेकर
नटाला जिथे पैसे मिळत नाहीत, ते प्रायोगिक नाटक असा समज आहे. निर्मात्याला पैसे मिळवून देण्यासाठी व्यावसायिक नाटक करतो.
प्राजक्त देशमुख
मला कुठलाही शिक्का नसलेले नाटक करायचे होते. त्यातून ‘देवबाभळी’ हे संगीत नाटक केले. चांगली गोष्ट असलेलेच नाटक मी यापुढे करत राहणार.
अद्वैत दादरकर
आमच्या पिढीच्या नाटकांना विशिष्ट प्रकारचे लेबल नाही. नाट्यक्षेत्रात वावरल्यावर, मी नक्की कुठल्या प्रकारचे नाटक करू, अशी गोंधळात टाकणारी स्थिती झाली आहे़
प्रियदर्शन जाधव
नाटकांतली काही सिनिअर नाटक पाहायला येत नाहीत. आपलीच माणसे जेव्हा आमचे नाटक पाहात नाहीत तेव्हा वाईट वाटते.
प्रताप फड
आम्हाला काही कळत नाही, असे अनेकांना वाटत असते. करतोय तेच कर; ‘कॅल्क्युलेशन्स’मध्ये अडकू नको, असे सल्ले मिळतात. नाटकच खºया अर्थाने नाटक चालवते.
देवेंद्र पेम
लेखक म्हटले की तेंडुलकर, कोल्हटकर असे म्हटले जाते. मग आमचे काय? आम्हाला अजून काही माणसे सांगतात की तुम्ही अजून काहीतरी करा.