प्रयोग नव्हे, त्यांच्यासाठी जादू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 04:02 AM2017-02-27T04:02:49+5:302017-02-27T04:02:49+5:30
रॉकेट, पाण्याचे कारंजे हे विज्ञान प्रयोग म्हटलं की आपल्याला आठवते ती प्रयोगशाळा आणि तणाव
स्नेहा पावसकर,
ठाणे- हवेच्या दाबामुळे फुग्यावर चालणारी गाडी, फुग्यामुळे उडणारे रॉकेट, पाण्याचे कारंजे हे विज्ञान प्रयोग म्हटलं की आपल्याला आठवते ती प्रयोगशाळा आणि तणाव. पण हे प्रयोग अवघड नव्हेत. जादू समजून ते अतिशय सहज, वारंवार करू न आणि त्यातून आनंद घेण्याबरोबरच इतरांना आनंद देणारे ‘विशेष बालवैज्ञानिक’ पाहायला मिळाले ते सरस्वती क्रीडा संकुलातील आनंद मेळा कार्यक्रमात.
‘विश्वास’ सामाजिक संस्थेच्या २७ व्या वार्षिक स्रेहसंमेलनानिमित्त हा कार्यक्रम झाला. त्यात या विशेष मुलांनी अनेक प्रयोग सादर केले. वेगळं काही तरी करण्याची जिद्द, त्यासाठी प्रबळ इच्छा आणि उत्साह या विशेष मुलांमध्ये असतो, याचा प्रत्यय रविवारच्या आनंदमेळ्यात उपस्थितांना आला. ‘आम्ही आधी कधीच असे प्रयोग केले नव्हते. पण आता खूप मजा येते. वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटतात. आम्ही अजून खूप प्रयोग शिकणार आहोत, असं या ग्रुपमधील बालवैज्ञानिक अरूणा सांगते. प्रयोग शिकताना आपल्या शिक्षकांना हे कसं होते, का होतं, आता पुढे काय करायचं ? अशा अनेक शंका ही मुले कुतुहलाने विचारतात. मात्र यांच्यातील सुयश आणि रेश्मा हे दोघेही व्यासपीठावर प्रयोग सादर करताना आपल्या शंकांना प्रश्न स्वरूप देऊन उपस्थित प्रेक्षकांनाच मोठया धीराने प्रश्न विचारत होती आणि प्रेक्षकही त्यांना विद्यार्थ्यांप्रमाणे उत्तरे देत होते. आमच्यासारखे प्रयोग तुम्हाला पण करावं असं नक्की वाटेल, असं सुयश विश्वासाने त्यांना सांगत होता.
मूळातच या विशेष मुलांना हे प्रयोग शिकवायचे ठरवले, तेव्हा मला एक चॅलेंज वाटले होते. कारण आपण दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो ते त्यांना तितक्या सहजपणे समजतील का असा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यामुळे एखादा शब्द सांगताना तो विथ अॅक्शन अर्थात हातवारे करून सांगावा लागतो.
पाण्याचा प्रयोग शिकवायचा म्हटला की पाणी म्हणजे काय? ते कुठे कुठे उपलब्ध असते? कुठून येते? हे त्यांना समजवावे लागले. एकच शब्द, वाक्यं पुन्हापुन्हा बोलावी लागतात. तीही त्याच क्रमाने. तेव्हा त्यांना कळतं आणि थोड्या वेळाने ती मुलंही ते बोलू लागतात. फक्त प्रयोगांची नाव आणि ते तोंडी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवावी लागते आणि ते समजल्यावर ते आपण स्वत: करावे यासाठी त्यांची जी धडपड असते, त्याचे कौतुक वाटते. येत्या वर्ष-दीडवर्षभरात ही मुलं राष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठीही प्रयोग सादर करू शकतात, अशी अपेक्षा मुलांना प्रयोग शिकविणाऱ्या जिज्ञासा ट्रस्टच्या सुमिता दिघे सांगतात.
सर्वसामान्य मुलं प्रयोग दाखवल्यावरही ते करायला स्वत:हून पुढे येत नाहीत. परंतु या मुलांमध्ये सर्वात आधी ते करण्यासाठी चढाओढच असते. सुरूवातीला मला वाटायचे या मुलांना प्रयोग शिकवायला खूप वेळ लागेल. मात्र या मुलांना एक प्रयोग शिकवायला १०-१५ मिनिटचं लागतात. हवा, पाणी आणि हवेचा दाब यावर आधारित मेणबत्ती ज्वलन, हवेच्या दाबामुळे बाटलीतून पाणी बाहेर येणे, रॉकेट उडवणे असे अनेक प्रयोग आम्ही शिकविले आहेत, असेही दिघे यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान विज्ञान शिक्षिका सुमिता दिघे, जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे आणि त्यांचे सहकारी महेंद्र पवार यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्याच हस्ते करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला.
>आकलनशक्ती
उत्तम अन उत्साहही
सर्वसामान्य मुलं प्रयोग दाखवल्यावरही ते करायला स्वत:हून पुढे येत नाहीत. परंतु या मुलांमध्ये सर्वात आधी ते करण्यासाठी चढाओढच असते.
सुरूवातीला मला वाटायचे या मुलांना प्रयोग शिकवायला खूप वेळ लागेल. मात्र या मुलांना एक प्रयोग शिकवायला १०-१५ मिनिटचं लागतात.