‘जलयुक्त शिवार’ खिसे भरण्यासाठी नाही
By admin | Published: May 4, 2015 01:34 AM2015-05-04T01:34:34+5:302015-05-04T01:34:34+5:30
जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येणारी जलसंधारणाची कामे अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी नाही, या योजनेतून गुणवत्तापूर्ण कामे अपेक्षित असून
नागपूर : जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येणारी जलसंधारणाची कामे अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी नाही, या योजनेतून गुणवत्तापूर्ण कामे अपेक्षित असून प्रत्येक कामांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष असणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
जलयुक्त शिवार योजनेच्या कार्यशाळेच्या समारोपात रविवारी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
फडणवीस यांनी योजनेचे महत्त्व पटवून देतानाच यातून नागपूर जिल्हा टंचाईमुक्त व्हावा आणि संपूर्ण देशासाठी नागपूरचे काम पथदर्शी ठरावे त्यादृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, जलसंधारणाची कामे म्हणजे खिसे भरण्याची संधी असे मानले जाते. मात्र ही योजना त्यासाठी नाही. आपण आकस्मिक भेट देऊन तेथील कामाची पाहणी करू, तसेच प्रत्येक कामांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नजर ठेवून कुठल्याही कामात गडबड होणार नाही याची काळजी घेऊ , असे फडणवीस म्हणाले. अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून कामे करावी ,असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)