कचरेवाला नाही, सफाईवाला म्हणा!
By admin | Published: January 5, 2015 06:33 AM2015-01-05T06:33:22+5:302015-01-05T06:33:22+5:30
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते.
मुंबई : आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे मोलाचे योगदान असते. कचरा उचलणाऱ्या व्यक्तींची समाजात अवहेलना केली जाते. कचरेवाले आपण असून, ते साफसफाईचे काम करीत असल्याने त्यांना आपण सफाईवाला म्हटले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी केले.
भारतीय विज्ञान परिषदेत ‘स्वच्छ भारत’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ओआरएफ संस्थेचे सुधींद्र कुलकर्णी, प्राचार्य उदय साळुंखे, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. निमसे, पुणे येथील रुरल रिलेशन संस्थेचे प्रमुख प्रदीप लोखंडे, समग्र संस्थेचे स्वप्निल चतुर्वेदी, थ्रीएस अँड सारा या कंपनीचे मुख्य कार्यकारी राजीव खेर आदींनी स्वच्छ भारत याविषयी सध्या असलेल्या समस्या आणि त्यावरील उपायांचा वेध घेतला.
देशात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन तो अधिक गतीने सोडविता येईल. देशात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने लोकांची मानसिकता बदलत असून, स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मोठी स्वागतार्ह बाब असल्याचे माशेलकर या वेळी म्हणाले.
महात्मा गांधी यांनी स्वच्छता आणि सत्यतेची संकल्पना देशातील जनतेत रुजवली. या संकल्पनेला आज पुन्हा एकदा बळकटी मिळाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांची मानसिकताही तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ओआरएफचे सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई, राज्यासह देशातील स्वच्छतेच्या अनेक प्रश्नांवर मत व्यक्त केले. मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबतचे वास्तव त्यांनी परिषदेत मांडले. मुंबईत गटारांसह विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांपैकी महिन्यातून सुमारे २२, तर वर्षाला ३८५ जणांना आपला जीव गमवावा लागत असून, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधांची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)