चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही
By admin | Published: October 29, 2015 01:18 AM2015-10-29T01:18:18+5:302015-10-29T01:18:18+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत.
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत. वर्षभराच्या काळात या सरकारने दोन आघाड्यांवर मात्र कौतुकास्पद काम केले, हे मान्य करावे लागेल.
एक म्हणजे जलशिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न, तर दुसरे इंदू मिल आणि लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. विशेषत: आघाडी सरकारने बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबितच ठेवला. नव्या सरकारने मात्र दोन्ही प्रश्न वर्षभरात तत्परतेने मार्गी लावले. शेतकरी आत्महत्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. केवळ पैसे वाटून आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. त्यासाठी शाश्वत योजना आखण्याची आवश्यकता होती. फडणवीस सरकारने जलशिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत पाणी प्रश्न सोडविण्याची कटीबध्दता स्पष्ट केली आहे. धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मोठे आंदोलन छेडले होते. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
भाजपाचे नेते बारामतीकरांचा पाहुणचार घेत आहेत. त्यांच्या सल्ल्याने कामकाज कराल, तर तुम्हालाही रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. सगळे दिसते आणि समजते. त्यामुळे जनतेला जी आश्वासने दिली, त्यांच्या पूर्ततेसाठीच सरकारने आपले लक्ष केंद्रित करायला हवे.
- आ. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष