खर्चासाठी निधी नसल्यानं बालचित्रवाणी संस्था बंद

By admin | Published: May 31, 2017 03:04 PM2017-05-31T15:04:25+5:302017-05-31T15:04:25+5:30

ई-बालभारती संस्था स्थापन होणार : राज्य शासनाचा निर्णय

Not having the funding for the childhood organization closed | खर्चासाठी निधी नसल्यानं बालचित्रवाणी संस्था बंद

खर्चासाठी निधी नसल्यानं बालचित्रवाणी संस्था बंद

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 -   लहान मुलांचे दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम बनवण्यासाठी कार्यरत असलेली राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) अखेर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून बुधवारी घेण्यात आला आहे. बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
विधी व न्याय विभाग व वित्त विभाग यांच्या अभिप्रायानुसार ३ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत बालचित्रवाणी संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्याबाबतचा शासन आदेश राज्य शासनाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी बुधवारी काढला आहे.
 
शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ला बालचित्रवाणीची स्थापना केली. बालचित्रवाणीकडून आतापर्यंत ६ हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. दूरदर्शनवर दररोज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात येत होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. 
 
पुण्यामध्ये राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाजवळ बालचित्रवाणीचे प्रशस्त कार्यालय आहे. बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता संस्थेच्या रेकॉर्डसह बालभारती या संस्थेकडे वर्ग करण्यात येणार आहे. याठिकाणी लवकरच ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
बालचित्रवाणी संस्थेमार्फत दूरदर्शनवरून १९८६ ते २०१२ या कालावधीमध्ये नि:शुल्क कार्यक्रम प्रक्षेपित केले जाते. मात्र दूरदर्शनने हे कार्यक्रम दाखविण्यासाठी प्रक्षेपण शुल्क आकारल्यामुळे फेब्रुवारी २०१४ पासून प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. संस्थेला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानही एप्रिल २००३ नंतर बंद झाले आहे.
 
त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती. बालचित्रवाणी संस्थेतील कर्मचाºयांचे वेतन तसेच इतर खर्च बालभारती संस्थेकडून उसनवारीकरून अदा केली जात होती.  बालचित्रवाणीत काम करणारे निर्मिती सहायक, कॅमेरामन, संकलक, वेशभूषाकर, तंत्रज्ञ आदींचे पगार एप्रिल २०१४ थांबवण्यात आले होते.  पगार मिळण्यासाठी न्यायालयात गेले होते. 
 
औद्योगिक कलह कायद्यातील कलमानुसार ५० पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते. त्यानुसार विधी विभागाच्या अभिप्रायानुसार संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-बालभारती संस्था कार्यान्वित झाल्यानंतर बालचित्रवाणीचे कर्मचारी ई-बालभारतीसाठी निश्चित केलेल्या आवश्यक पदांची शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत असल्यास त्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात प्राधान्य देण्यात येणार आहे.
 

Web Title: Not having the funding for the childhood organization closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.