औरंगाबादच नव्हे; अनेक भागांत ‘सारी’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:16 AM2020-04-11T06:16:13+5:302020-04-11T06:16:25+5:30
‘आयसीएमआर’चे संशोधन; राज्यातील ५५३ पैकी २१ जणांना कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशभर केलेल्या अभ्यासात सिव्हीअर अॅक्यूट रेस्पीरेटरी इलनेस म्हणजेच ‘सारी’ हा आजार असलेल्या ५ हजार ९११ पैकी १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील २१ जणांचा समावेश आहे.
राज्यातील ‘सारी’च्या ५५३ रुग्णांची ‘कोरोना’ची चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यात अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल, असेही अभ्यासात म्हटले आहे.
‘सारी’ हा श्वसनाचा आजार आहे. तसेच कोरोनामध्ये ही अनेक रुग्णांना श्वसनास त्रास होतो. त्यामुळे ‘आयसीएमआर’च्या शास्त्रज्ञांच्या टीमने १५ फेब्रुवारी ते १९ मार्चमध्ये देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल सारीच्या रुग्णांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली. त्यामध्ये ५ हजार ९११ रुग्णांचा समावेश होता.
त्यापैकी १.८ टक्के म्हणजे केवळ १०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रासह २० राज्यातील ५२ जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश होता. गुजरात (७९२) व तामिळनाडू (५७७) पाठोपाठ महाराष्ट्र(५५३) सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक ३.८ टक्के म्हणजे २१ जण कोरोनाबाधित होते.