'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:50 PM2024-05-05T13:50:25+5:302024-05-05T13:50:57+5:30
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दावा केला की, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले IPS अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Congress defended Pakistani terrorist Kasab.
— Tajinder Bagga (Modi Ka Parivar) (@TajinderBagga) May 5, 2024
Congress leader Vijay Wadettiwar says “Hemant Karkare was not killed by bullets of terrorists like Ajmal Kasab, but by cop close to RSS" pic.twitter.com/OiG41XFzMx
यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी उत्तर मध्य मुंबईतून निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे तेच सरकारी वकील आहेत, ज्यांच्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. निकम यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस निकम यांच्यावर गंभीर आरोप करत आहे.
फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, उज्ज्वल निकमसारख्या देशभक्ताला आम्ही तिकीट दिले, त्यामुळे काँग्रेस नेते उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केल्याचे सांगतात. म्हणजे काँग्रेसला मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या अजमल कसाबची चिंता आहे. आमची महायुती उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्तासोबत आहे, तर महाविकास आघाडी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांसोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे मतदाराने ठरवावावे.
Watch: BJP leader Shehzad Poonawalla says, "The kind of vote bank politics that the Congress party is engaging in, even on issues like national policy and national security, shows its true face. By opposing Modi, the Congress has essentially given a clean chit to Pakistan, which… pic.twitter.com/kEB6gfv8gi
— IANS (@ians_india) May 5, 2024
भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर टीका केली. ते म्हणतात, आता मला समजले की, काँग्रेस पक्षाला थेट पाकिस्तानमधून आशीर्वाद का येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी 26/11 प्रकरणी पाकिस्तानला क्लीन चिट दिली. शहीद हेमंत करकरे यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नाही, तर हिंदूंनी केली आणि त्याला लपवण्याचे काम उज्ज्वल निकम यांनी केले, असे त्यांचे म्हणणे आहे. हे तेच उज्ज्वल निकम आहेत, ज्यांनी राष्ट्रहितासाठी आपल्या वकिलीतून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला फासावर नेले. नक्षलवाद्यांना शहीद म्हणणारे आणि लष्कराला बलात्कारी म्हणणारेच खरे देशद्रोही आहेत. राष्ट्रीय धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवरही काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत आहे, म्हणूनच आज पाकिस्तान सातत्याने काँग्रेसच्या समर्थनार्थ पुढे येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.