मुंबईत 3 जुलै रोजी पुन्हा "नॉट इन माय नेम"
By admin | Published: July 1, 2017 12:06 PM2017-07-01T12:06:18+5:302017-07-01T12:20:22+5:30
28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा नॉट इन माय नेम ही निदर्शने करण्यात येणार आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.1- 28 जून रोजी झुंडशाही विरोधात देशभरातील विविध शहरांमध्ये निदर्शने केल्यानंतर आता तीन जुलै रोजी मुंबईमध्ये पुन्हा "नॉट इन माय नेम" ही निदर्शने करण्यात येणार आहेत. सोमवार 3 जुलै रोजी दुपारी चारनंतर दादर येथील वीर कोतवाल उद्यानापासून चैत्यभूमीपर्यंत हा झुंडशाहीविरोधात निषेध व्यक्त केला जाणार आहे.
नवी दिल्लीमधून हरियाणामध्ये जाणाऱ्या जुनैद खानची जमावातर्फे हत्या करण्यात आल्यानंतर याबद्दल समाजातील विविध घटकांमधून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. दिल्लीमधील चित्रपट निर्माते राहुल रॉय आणि त्यांची पत्नी सबा दिवान यांनी याबाबत दिल्लीमधील जंतरमंतर येथे निदर्शने करण्याचा संकल्प फेसबूकवर व्यक्त केला होता. त्याला देशभरातून आणि देशाबाहेरही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 28 जून रोजी नवी दिल्लीसह देशातील बंगळुरु, मुंबई, कोलकाता तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये ही निदर्शने करण्यात आली. मुंबईमध्ये वांद्रे येथील कार्टर रोड येथे सुमारे 1000 नागरिकांनी एकत्र येऊन नॉट इन माय नेम लिहिलेले फलक उंचावून निषेध व्यक्त केला होता. आता सोमवारी पुन्हा दादर येथे ही निदर्शने करण्यात येणार आहेत.
नॉट इन माय नेम निदर्शनांमध्ये मी का सामील झालो ? - हरिश सदानी, मेन अगेन्स्ट वूमेन अब्यूज
2015 साली दादरीमध्ये अखलाखला त्याच्या घरामध्ये बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने ठार मारले. त्यानंतरही बीफ असल्याचा संशय घेऊन जमावाने कायदा हातात घेऊन हत्या करण्याच्या काही घटना घडल्या. आता जुनैदची हत्या झाल्यानंतर सबा दिवानने फेसबुकवर याबाबत संताप व्यक्त करत झुंडशाहीचा निषेध करण्याचे ठरवले. नॉट इन माय नेम या नावाने सुरु झालेले हे आंदोलन देशात आणि देशाबाहेर पसरले. सोशल मीडियावर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतील कार्टर रोड येथे आम्ही जमण्याचे ठरवले. समाजातील विविध स्तरातील लोक यामध्ये सामील झाले होते. जर सामान्य लोक स्वतःहून या निदर्शनांमध्ये सामील होतात तर आपण का मागे राहावे अशीच भावना यामध्ये सहभाग घेताना आमची होती. चित्रपट निर्माते, पत्रकार, कलाकार, महाविद्यालयीन तरुण असे विविध क्षेत्रातील लोक तेथे आले होते. कल्की कोचलिन, शबाना आझमी, रजत कपूर, आनंद पटवर्धन यांनीही यावेळेस उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. सर्वांनी नॉट इन माय नेमचे फलक हातात घेऊन रिंगण केले, तसेच गाण्यांद्वारेही आपला निषेध व्यक्त केला. यावेळेस कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. कदाचित याचाच परिणाम म्हणून किंवा देशभरातून उमटणाऱ्या निषेधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परवा गोरक्षणाखाली होणाऱ्या हत्यांबाबत बोलावे लागले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर बोलताना जुनैदचा भाऊ हाश्मीने व्यक्त केलेले मत बरेच काही सांगून जाते. पंतप्रधानांनी हे वक्तव्य करण्यास फारच उशीर झाला आहे, त्यांच्या मनात आले तर हे प्रकार एका दिवसात थांबतील असे त्याने मत व्यक्त केले आहे.