सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:50 PM2024-10-07T19:50:37+5:302024-10-07T19:51:11+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी परखड भाष्य केलं आहे.

Not on sympathy Mva seat allocation will be on merit says congress leader Nana Patole | सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

Congress Nana Patole ( Marathi News ) : "शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हेदेखील आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप हे मेरिटवरच व्हायला हवं," अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत व्हिडीओ'चे संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडली आहे.

"महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याचं दिसत आहे. जागावाटप काँग्रेसच्या मनासारखं होत आहे का?" असा प्रश्न मुलाखतीदरम्यान नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना पटोले यांनी म्हटलं की, "महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल आमची भूमिका अतिशय साधी आणि सरळ आहे. मेरिटच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा, असं आमचं मत आहे. जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला विकणारं सरकार सत्तेतून बाहेर काढता येईल. सत्ताधाऱ्यांचे चमत्कार फारच गंमतीशीर आहेत. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आणि आता तिथेही कर्ज करून आले. तिथल्या एका कंपनीने यांना नोटीस पाठवली असून कर्ज भरण्याची सूचना केली आहे. हे जिथं जातात तिथं कर्ज करून येतात. आता बुधवारी सरकारने निर्णय घेतला आणि ३० हजार कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट केला. म्हणजे आता सरकारला कर्मचाऱ्यांचे पगारही कर्जातून करावे लागणार आहेत. हे असं बिनकामी सरकार, शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेतून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. त्यामुळे हे सरकार मुळासकट उखडून फेकण्यासाठी जागावाटप मेरिटच्या आधारे व्हावं, अशी आमची भूमिका आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीचा काँग्रेसलाही मोठा फायदा झाला आहे, त्यामुळे काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना गृहित धरू नये, त्यांचा मान-सन्मान करावा, असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, यावर काँग्रेसची भूमिका काय?" असाही प्रश्न 'लोकमत व्हिडीओ'च्या मुलाखतीदरम्यान नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाना पटोले म्हणाले, "आम्ही मान-सन्मानच देत आहोत. ज्या भाजपने यांची घरं फोडली, यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचाच काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर मेरिटवर निर्णय घ्यावा आणि या नेत्यांचा सन्मानही त्यातच आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. उद्धव ठाकरे हेदेखील आमच्यासाठी आदरणीय आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्वच बाबतीत त्यांच्या हो ला हो म्हणू. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप हे मेरिटवरच व्हायला हवं."

दरम्यान, "विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांचं मतविभाजन होणार नाही, यासाठीचा प्लॅन आमच्या तीनही पक्षांकडे तयार आहे. जागावाटप झाल्यानंतर तो प्लॅन आम्ही जाहीर करू," अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

 

Web Title: Not on sympathy Mva seat allocation will be on merit says congress leader Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.