महाराष्ट्रात मुली नव्हे, मुलं चढतात कमी वयात बोहल्यावर!
By Admin | Published: January 30, 2016 03:31 PM2016-01-30T15:31:07+5:302016-01-30T15:31:19+5:30
कमी वयातच मुलींचे होणारे लग्न हा देशभरात चिंतेचा विषय असला तरी महाराष्ट्रात मुलींपेका मुलंच लहान वयात लग्न करतात
>राज्यातील धक्कादायक वास्तव
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - कमी वयातच मुलींचे होणारे लग्न हा देशभरात चिंतेचा विषय असला तरी महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती अगदी उलट असून याबाबतीत मुलांची संख्या मुलींपेक्षा अधिक आहे. राज्यात प्रत्येक दहावा मुलगा आणि प्रत्येक ९वी मुलगी कमी वयात बोहल्यावर चढते, अशी माहिती केंद्र सरकारच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तसेच आजच्या काळातही १५ ते १९ या वयोगटात माता बनणा-या मुलींचे राज्यातील प्रमाण ५ टक्के इतके आहे.
नीति आयोगाच्या आकड्यांनुसार, कमी वयातच मुलांची लग्नं होण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये आहे, तेथे ३० टक्क्यांहून अधिक मुलांचे लग्न कायदेशीर मान्यता असणा-या २१ वर्षांच्या आतच केले जाते. त्यानंतर जालना (२७.६ टक्के), बीड (२४.७ टक्के), सोलापूर (२२.५) नांदेड (२१.१ टक्के), हिंगोली (२०.७ टक्के) आणि अहमदनगर (२०.५ टक्के) यांचा नंबर लागतो. तर १८ वर्षांच्या आतच मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण हिंगोलीत (१७.६ टक्के) सर्वाधिक असून त्यानंतर नांदेड (१७.५ टक्के), परभणीमध्ये (१७.५) हे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान मुलींनी कमी वयातच आई बनण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये (१० टक्के) आहे. त्याव्यतिरिक्त सांगलीत ८.७ टक्के, उस्मानाबाद ८.१ टक्के आणि बीडमध्ये ७.५ टक्के मुलींनी कमी वयातच बाळाला जन्म दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये मुलींच्या लग्नाचे वय २५ तर मुलांच्या लग्नाचे वय २५-२६ इतके असते. तर मायानगरी मुंबईत मुलांच्या लग्नाचे वय सुमारे २७ तर मुलींचे वय सुमारे २४ असते.