केवळ आरक्षण नको, संरक्षण हवे
By Admin | Published: March 8, 2016 12:53 AM2016-03-08T00:53:42+5:302016-03-08T00:53:42+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परिचर्चेत विविध क्षेत्रांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराला महिलांनीच वाचा फोडली
पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परिचर्चेत विविध क्षेत्रांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजात महिलांवर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराला महिलांनीच वाचा फोडली. आरक्षणापेक्षा महिलांना सामाजिक सुरक्षितता महत्त्वाची वाटते. सुशिक्षित असण्याबरोबर संस्कारित पिढी घडल्यास महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होणार नाही, असा सूर परिचर्चेतून निघाला.
समानतेपेक्षा कृ ती महत्त्वाची
महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य यंत्रणा बसवून फायदा नाही. कचरावेचक तसेच वर्ग चारमध्ये सफाई काम करणाऱ्या महिलांच्या घरातील वातावरण वेगळेच असते. घरात रोजच वाद, भांडण, महिलेने दिवसभर काबाडकष्ट करून मिळविले. पैसे संध्याकाळी घरी गेल्यानंतर दारू पिण्यासाठी पतीला द्यावे लागतात. नकार दिल्यास मारहाण केली जाते. कामावर जाणाऱ्या महिलांना दिवसभर विविध समस्यांना सामोरे जावे लागते. घरी आल्यानंतरसुद्धा त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही.
- सोनाली कुंजीर
मुलांबरोबर पालकांचा संवाद वाढावा
महिला आज सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत. घराबाहेर पडल्यावर वाटणारी असुरक्षितता टाळण्यासाठी घरापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. मुले मोबाइलवर नेमकं काय करतात? त्यांची संगत कोणाबरोबर आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. व्यक्तीमध्ये थोडी आध्यात्मिकता असायला पाहिजे. आध्यात्मिक विचारांमुळे वाईट विचाराला मनात थारा मिळत नाही.- राजश्री गारगे, उद्योजिकासंस्कृती जपणे आवश्यक
प्रत्येक वेळी महिला दिनाचे निमित्त म्हणून महिला समस्या आणि उपाय यावर चर्चा होण्यापेक्षा महिला समस्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष अशा एका दिवसाची गरज भासणार नाही. महिलांंना कायद्याने संरक्षण दिलेले आहे. मात्र त्याचा गैरवापर टाळायला हवा. आई-वडील व मुलांमधील संवाद कमी होत आहे. त्यातून अनेक समस्या उद्भवत आहेत. स्त्री-पुरुष एकमेकांवर अवलंबून असून, एकमेकांना पूरकही आहेत. घरगुती छळाच्या घटना, तसेच घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे.
- मेरी जोसेफ, वकीलमहिलांमध्ये जागरूकता महत्त्वाची
अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे. महिला अत्याचार आणि त्यासाठी असलेले कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्या कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकते, याची माहिती मिळविणे गरजेचे आहे. महिलांमध्ये कायद्यांबाबत अनास्था आहे. ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या ठिकाणी महिलांसाठी सहायक मदतकक्ष असणे आवश्यक आहे. या कायद्यांबाबात जागृती आवश्यक आहे. कायदा फक्त कागदावरच न राहता त्याचा योग्य वापर होणे हे महिलांसाठी एक संरक्षण आहे.- मनीषा गवळी, वकीलबाहेर आणि घरातही असुरक्षितच
कामासाठी बाहेर पडलं, तर कामाच्या ठिकाणी ठेकेदार तसेच अन्य व्यक्तींकडून त्रास होतो. कामावरून घरी गेल्यानंतर आर्थिक बिकट परिस्थितीमुळे कुटुंबात किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादाला तोंड द्यावे लागते. मुलाबाळांच्या भविष्याची चिंता भेडसावते. कचरावेचकाचे काम करणारी महिला ही शेवटच्या समाजघटकाचे प्रतिनिधित्व करते. तिला बाहेर आणि कुटुंबातही सुरक्षिततेची शास्वती नाही. त्यात बदल घडून यावा, हीच अपेक्षा आहे.
- सुरेखा म्हस्के, कचरावेचक चर्चासत्र नको, तर कृतिसत्र महत्त्वाचे
चर्चा करण्यापेक्षा योग्य कृती महत्त्वाची आहे. यशस्वी पुरुषामागे जसा स्त्रीचा हात असतो, तसा यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाची खंबीर साथ असते हेसुद्धा या निमित्ताने व्यक्त केले पाहिजे. भावी पिढीला संस्कारक्षम करणे आवश्यक आहे. मनं स्वच्छ झाली क ी, समाज आपोआप स्वच्छ होईल. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.
- सुरेखा कामथे, शिक्षिका, मॉडर्न हायस्कूलमहिलांनी सक्षम व्हावे
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांवर अत्याचार होतात, असा समज पसरवला जातो. त्यात काहीअंशी तथ्य असले, तरी महिलांनीही आपण समाजात कसे वागतो, याचे आत्मपरीक्षण करावे. सुशिक्षित महिलांमध्ये ‘मी’पणाची भावना वाढू लागली आहे.काही महिला सुशिक्षितपणाचा गैरफायदा उठवतात. महिला अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांत अनेक प्रकरणे बनावट असल्याचे दिसून येते. बसमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीचे प्रकार घडतात, त्या वेळी महिलांनी स्वत: त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. पोलिसांकडे धाव घेतली पाहिजे.
- रत्नमाला सावंत, पोलीस निरीक्षक, पिंपरी विभाग
दृष्टिकोन बदलायला हवा
घरातूनच मुलांवर सुसंस्कार होणे गरजेचे आहे. मुलीकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता तिच्याकडे आदरयुक्त भावनेने पाहणे आवश्यक आहे. शारीरिक वासना महिला अत्याचाराचे प्रमुख कारण आहे. अशा अत्याचारांना बळ कोठून मिळते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वय ज्या प्रकारे वाढते, त्या प्रकारचे शहाणपण मुलांमध्ये येत नाही. घरात आजी-आजोबा असले की, मुलांवर संस्कार घडतात. मात्र, विभक्त कुटुंब पद्धतीत हे सर्व हरवलं आहे.
- ज्योती पठाणीया, सामाजिक कार्यकर्त्या
मुलगा-मुलगी भेद कशासाठी?
मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कशासाठी करायचा? घरातलं काम स्त्रियांनीच का करायचं? घरातून संस्कार देतानाही मुला-मुलींमध्ये भेद करायला नको. संस्काराची खरी शिदोरी आईपासून मिळते. त्यामुळे घरातच मुलगा-मुलगी यांना समानतेची वागणूक दिली, तर त्याच संस्कारात ते पुढे वाढतील. त्यात वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिका सुरक्षित आहे का? महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण पाहिजे.
- भारती वायसे, मेट्रन, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय