कागदाअभावी नोटाछपाई बंद; विशिष्ट कागदाची टंचाई, ठरावीक कंपन्याच करतात पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:05 AM2018-04-19T04:05:09+5:302018-04-19T04:05:09+5:30
नोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे.
- सोपान पांढरीपांडे
नागपूर : नोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे.
चलनी नोटांमधील ‘वॉटरमार्क’ (म.गांधींची प्रतिमा) व सिक्युरिटी थ्रेड (भारत/इंडिया लिहिलेला चमकदार धागा) हे कागदाच्या निर्मितीच्या वेळी केले जाते. हे काम कंपनीच करते. नोटेच्या आकाराप्रमाणे एका कागदात २० ते ४० ब्लॉक्स असतात. त्याला रॉ नोट्स म्हटले जाते.
या कंपन्यांचा कब्जा
सूत्रांनी सांगितले की, नोटांसाठी लागणाºया विशिष्ट कागदाच्या बाजारपेठेवर जगातील पाच ते सहा कंपन्यांचा कब्जा आहे. यात अमेरिकन बँक नोट कंपनी, दि ला रू (इंग्लंड), गिसेक अँड डिवॅरियांत (जर्मनी), लोझेंथॉल (जर्मनी), फेब्रिआनो (इटली), लँग्कवार्त (स्वित्झर्लंड) आणि अन्य दोन-तीन कंपन्या आहेत.
नोटाटंचाईवर खलबते
मुंबई : चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.
३२ हजार कोटींच्या अतिरिक्त नोटा
देशात ६ एप्रिलअखेर १८.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. यामध्ये आठवडाभरात ३२ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलअखेर देशभरात १८.७३ लाख कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणण्यात आल्या.
यापैैकी ६.७० लाख कोटी रुपयांच्या नोटा २००० च्या असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. नेमक्या याच नोटा चलनात असल्या, तरी बाजारात नाहीत.
३० टक्क्यांहून अधिक नोटा अचानक ‘गायब’ होऊन चलन तुटवडा निर्माण झाला आहे.