बहीण नव्हे, मुलीची हत्या !
By admin | Published: August 27, 2015 05:31 AM2015-08-27T05:31:28+5:302015-08-27T05:46:18+5:30
देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण
मुंबई : देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण नसून पोटची मुलगी होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. शीना बोहरा (२२, हत्या झाली तेव्हाचे वय) ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांचे अपत्य होते. २४ एप्रिल २०१२ रोजी तिची हत्या झाली. आणखी धक्कादायक बाब ही की शीनाच्या हत्येसाठी इंद्राणीने ड्रायव्हरसह दुसरा पती संजीव खन्ना (५०) याचीही मदत घेतली होती. खार पोलिसांनी बुधवारी खन्नाच्याही मुसक्या आवळल्या. त्याला कोलकातातून अटक करण्यात आली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
इंद्राणीने पोटच्या मुलीची हत्या का केली, याबाबत खार पोलीस कसून तपास करीत आहेत. हे आॅनर किलिंग असावे किंवा शीनाच्या नावे असलेली इंद्राणीची मालमत्ता हेही यामागील कारण असावे, असाही पोलिसांचा अंदाज आहे.
दोन महिन्यांपासून तपास...
गेल्या दोन महिन्यांपासून खार पोलीस या हत्याकांडाचा गोपनीयरीत्या तपास करीत होते. इंद्राणीचा ड्रायव्हर राय याला खार पोलिसांनी शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे ७.६५ बोअरचे पिस्टल सापडले होते. याच शस्त्राबाबत चौकशी करताना खार पोलिसांना शीना हत्याकांडाची कुणकुण लागली. पुढे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने शीना हत्याकांडाचे सर्व तपशील दिले. त्याचा दावा पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीला गजाआड केले.
इंद्राणी, खन्ना व वाहनचालक श्याम मानव मनोहर राय या तिघांनी मिळून शीनाची हत्या केली. वांद्र्याच्या नॅशनल महाविद्यालयासमोरून या तिघांनी तिचे अपहरण केले. कारमध्येच गळा आवळून तिला ठार मारले. पुढे रायगड, पेण तालुक्यातील गागोदे या विनोबा भावेंच्या जन्मगावी एका दरीत तिचा मृतदेह पेट्रोल शिंपडून जाळला, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.