शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसेल: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:32 PM2019-12-20T16:32:27+5:302019-12-20T16:35:40+5:30
याचवेळी त्यांनी भाजप व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप सुद्धा सरकारने तयार केल्याचे बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार येताच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचे निर्णय घेतेले जातील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सरकारकडून लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून तसे संकेत सुद्धा देण्यात येत आहे.
तर याच मुद्यावरून बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गेल्यावेळच्या सरकारने 60 पेक्षा अधिक कॉलमचा अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतला होता. शेतकऱ्यांची संख्या कशी कमी करायची यासाठी त्यांच्या तो प्रयन्त होता. तर आता यावेळी अशा काही अटी किंवा शर्ती नसणार आहेत. तर शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसणार, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारकडे आम्ही मदत मागीतीली आहे. त्यामुळे ते जी मदत देतील घेऊ. मात्र बाकी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या पैश्याची जवाबदारी ही राज्य सरकारची असल्याचे सुद्धा चव्हाण म्हणाले. तसेच याचवेळी त्यांनी भाजप व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.