VIDEO- एन्काउंटर नव्हे; माझ्या मुलाचा कट रचून खून
By Admin | Published: November 4, 2016 06:47 AM2016-11-04T06:47:17+5:302016-11-04T06:47:17+5:30
भोपाळ येथे पोलीस चकमकीमध्ये ठार झालेल्या खालिद मुछाले याचा कट रचून खून करण्यात आल्याची तक्रार त्याची आई महिमुदा सलीम मुछाले हिने आज गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 4 - भोपाळ येथे पोलीस चकमकीमध्ये ठार झालेल्या खालिद मुछाले याचा कट रचून खून करण्यात आल्याची तक्रार त्याची आई महिमुदा सलीम मुछाले हिने आज गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. तत्पूर्वी सुमारे साडेचार तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या आदेशाने तक्रार अर्जाची नोंद करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी संबंधित तक्रार अर्ज भोपाळ पोलिसांना पाठवून देणार असल्याची माहिती दिली.
भोपाळ तुरुंगातून पळून गेलेले आठ जण सोमवारी मध्यप्रदेशात झालेल्या पोलीस चकमकीत मारले गेले होते. त्यात सोलापूरच्या खालिद सलीम मुुछाले याचा समावेश आहे. या घटनेनंतर खालिदची आई महिमुदा सलीम मुछाले यांच्यासह नातलग आज दुपारी १२.३० च्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यासाठी गेले. तेथे दखल न घेतल्याने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर यातून मार्ग निघाला. संबंधित तक्रार अर्जाची नोंद घेऊन भोपाळ पोलिसांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
---
भोपाळचे गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसह सहा जणांविरुद्ध तक्रार
तक्रारदार महिमुदा मुछाले यांनी मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह, पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी, पोलीस महासंचालक ऋषीकुमार चौधरी, भोपाळचे पोलीस अधीक्षक अरविंद सक्सेना, भोपाळ मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अखिलेश तोमर, मध्यप्रदेश दहशतवादी निरोधी पथकाचे प्रमुख संजीव श्यामी यांच्या विरोधात खुनाची तक्रार दिली आहे.
महिमुदा मुछाले यांनी दिलेल्या तक्रार अर्जात आपला मुलगा खालिद हा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याचा एन्काउंटर झालेला नसून, कट रचून पद्धतशीरपणे खून करण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. या प्रकाराला वरील सहा जण जबाबदार आहेत. मी भोपाळसारख्या दूर ठिकाणी जाऊ शकत नसल्याने तक्रार अर्ज येथील पोलीस ठाण्यात देत आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळावा, असे खालिदची आई महिमुदा हिने म्हटले आहे.
----
नातेवाईकांचा चार तास ठिय्या
तक्रार अर्ज देण्यासाठी गेलेल्या खालिदची आई महिमुदा यांच्यासमवेत खालिदची पत्नी परवीना, खालिदच्या दोन बहिणी यांच्यासह नई जिंदगी परिसरातील जमाव चार तास ठिय्या मारुन होता. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामध्ये जमिअत ए उलेमा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मौलाना नदीम मिस्त्री, लीगल सेलचे सेक्रेटरी अॅड. तैवरखान पठाण, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे श्याम गायकवाड, छ. शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे फारुक शेख, भारत मुक्ती मोर्चाचे अॅड. सैफन शेख, बामसेफचे बापू मस्के, एआयएसएफचे हसीब नदाफ आदींचा समावेश होता. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत चर्चा होऊन चार तासांनी पोलीस आयुक्तांच्या पुढाकारातून तक्रार अर्ज दाखल करून घेण्यात आला.
भोपाळ पोलिसांच्या चकमकीत मारल्या गेलेल्या खालिदची आई महिमुदा सलीम मुछाले यांच्या तक्रार अर्जाची नोंद घेतली आहे. आम्ही हा अर्ज भोपाळ पोलिसांकडे पाठवणार आहोत.
- रवींद्र सेनगावकर,
पोलीस आयुक्त, सोलापूर
---
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास
जबलपूर न्यायालयात खालिदसह पाच जणांच्या जामिनासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून खटला सुरु आहे. नजीकच्या काळात लवकरच त्यांना जामीन मिळण्याची चिन्हे सुरु होती. तत्पूर्वीच खालिदची ही घटना घडली. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, माझे अशील निरपराध असून, त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास जमिअत ए उलेमा हिंद संघटनेच्या लीगल सेलचे सेक्रटरी अॅड. तैवरखान पठाण यांनी व्यक्त केला.