पंजाबी साहित्य संमेलनाला नोटबंदीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 06:36 AM2016-11-16T06:36:03+5:302016-11-16T06:36:03+5:30
येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथे होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला नोटाबंदी तसेच आचारसंहितेचा फटका बसत आहे.
पुणे : येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथे होत असलेल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला नोटाबंदी तसेच आचारसंहितेचा फटका बसत आहे. आचारसंहितेमुळे पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात येणारा दोन कोटींचा निधी नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासनाकडे वर्ग करावा, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला पाठविल्याची माहिती ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी दिली.
संमेलनासाठी केंद्र सरकारने दोन कोटी रुपये, पंजाब सरकारसह राज्य सरकार व महापालिकेकडून अनुक्रमे २५ लाख रुपये देण्यात येणार होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा फटका संमेलनाला बसला आहे. संमेलनाचे अडीच कोटींचे बजेट १ कोटी २० लाखांवर आले आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख रुपयांची तूट भासत आहे, मात्र पंजाबी बांधवांनीच पुढाकार घेऊन रक्कम उभी केली आहे. त्यामुळे कदाचित संमेलनासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडून निधीची गरज भासणार नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित पत्र पाठविल्याचे नहार यांनी सांगितले.
अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठातील नामदेव अध्यासनाला २५ लाख रुपये द्यावेत, अशी विनंती पंजाब सरकारला केल्याची माहितीही नहार यांनी दिली. (प्रतिनिधी)
टपाल खात्यामध्ये संमेलनाच्या पत्रिका टाकायच्या होत्या. मात्र जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी मोठी रांग होती. कुरियरवाले ५००च्या नोटा स्वीकारण्यास तयार नव्हते. पंजाबपासून पुण्यापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे, मात्र ट्रान्सपोर्टसह डिझेलसाठी पैशांच्या अडचणी आल्या. हे संमेलन तूर्तास रद्द करावे, अशी सूचनाही पंजाब व महाराष्ट्र सरकारने केली होती. मात्र अडचणींवर मात करीत आम्ही संमेलन यशस्वी करु, असे ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले.