“ठाकरे सरकारकडून 'अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 11:00 AM2020-03-15T11:00:09+5:302020-03-15T11:06:58+5:30
जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.
मुंबई : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागेले. तर ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नसल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं हे अधिवेशन असेल, अशी आमची अपेक्षा होती. तसेच या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली छाप दाखवतील असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको, म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहातून नेहमी पळ काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.
राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं हे अधिवेशन असेल,अशी आमची अपेक्षा होती. तसेच, @CMOMaharashtra या अधिवेशनात आपली छाप दाखवतील असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको, म्हणून
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 14, 2020
उद्धवजींकडून सभागृहातून नेहमी पळ काढायचा प्रयत्न सातत्याने होत होता.
तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील अवाकाळीग्रस्त शेतकरी व सांगली, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनातून काहीही मिळालं नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तर पुढील अधिवेशनात तरी मुख्यमंत्री हे संपूर्ण काळ सभागृहात उपस्थित राहून, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील, अशी अपेक्षा असल्याचं पाटील म्हणाले.
२४ फेब्रुवारी पासून सुरु झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या भीतीमुळे एक आठवडा आधीच गुंडाळण्यात आले. या अधिवेशनात विधान परिषदेत २०१८ तारांकित प्रश्न आले होते. त्यातील ९०० प्रश्न स्वीकृत झाले तर अवघ्या ६३ प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली.