महामंडळाच्या १४ संचालकांना नोटिसा
By admin | Published: February 8, 2016 04:36 AM2016-02-08T04:36:53+5:302016-02-08T04:36:53+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दाखल केलेल्या दाव्याला अनुसरून कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या विद्यमान १४ संचालकांविरोधात
संदीप आडनाईक, कोल्हापूर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दाखल केलेल्या दाव्याला अनुसरून कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या विद्यमान १४ संचालकांविरोधात नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. काही संचालकांना याबाबतच्या नोटिसा मिळाल्या आहेत.
कोल्हापुरात १0 जानेवारी २0१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सध्याचे प्रभारी अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह १४ संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या द्वैवार्षिक सभा झाली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा न करताच ते विषय मंजूर केल्याच्या विरोधात महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, विजय शिंदे आणि रणजीत जाधव या सभासदांनी धर्मादाय आयुक्तांकडे दि. १४ जानेवारी रोजी दावा दाखल केला आहे. त्याच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सर्व १४ संचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी भास्कर जाधव यांच्यासह चौघांमार्फतही सर्व संचालकांना महामंडळाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत भाग न घेण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत.
या नोटिसीनुसार महांमडळावर ६ जानेवारी २0१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे धर्मादाय आयुक्तांमार्फत प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, त्यांच्यामार्फत संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ६ जून २0१३ रोजी महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी मेघराजराजे भोसले, सुरेंद्र पन्हाळकर आणि अर्जुन नलावडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता.
भास्कर जाधव यांच्यासह चार सभासदांच्या वकिलांनी पाठविलेली या संदर्भातील नोटीस मिळाल्याचे महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय कोंडके यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मात्र, कोणतीही नोटीस आपल्याला आली नसल्याचे कोंडके यांनी सांगितले. महामंडळाच्या गैरकारभारावर यापूर्वीही दावे दाखल करण्यात आले होते; परंतु ते दावे आयुक्त कार्यालयाकडून पुढे चालू राहिले नाहीत. यापूर्वीचे दावे हे कृती समितीने दाखल केले होते; परंतु या वेळी आम्ही चार सभासदांनी हे दावे दाखल केले आहेत. लवकरच महामंडळाची निवडणूक लागेल.
- भास्कर जाधव, माजी अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ