डेंग्यूग्रस्त १२ जिल्ह्यांना नोटिसा
By admin | Published: November 5, 2014 04:17 AM2014-11-05T04:17:20+5:302014-11-05T04:17:20+5:30
राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे
पुणे : राज्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या उच्चाटनासाठी काम न करणा-या अधिका-याना फैलावर धरले आहे. उद्रेक झालेल्या १२ जिल्ह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाने तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने हिवताप विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन डेंग्यूच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये १२ जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना डासांचा नायनाट करण्यासाठी आणि डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले होते.
कामात कुचराई केल्याचे दिसून आल्याने डॉ. जगताप यांनी तातडीने चंद्रपूर, पुणे, बीड, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, गोंदिया, ठाणे, सातारा, अमरावती, रायगड या १२ जिह्यांतील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
काही जिल्ह्यांमध्ये योग्य काम होत नसल्याचे दिसून आले. डेंग्यू वाढण्यामागचे हे एक कारण असल्याने त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिशींवर त्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.
राज्यात गेल्या ३ महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यात राज्यात डेंग्यूचे तब्बल ३ हजार ५६५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे.