२५० हेक्टर जमीन संपादित करण्याच्या सूचना
By Admin | Published: May 12, 2017 02:19 AM2017-05-12T02:19:36+5:302017-05-12T02:19:36+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची २५० एकर जमीन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जळगाव औद्योगिक क्षेत्रालगतची महसूल विभागाची २५० एकर जमीन जळगाव एमआयडीसीच्या विस्तारासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने तयार करावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
मंत्रालयात जळगाव येथील उद्योगांच्या अडीअडचणीबाबत जळगाव इंडस्ट्रीज असोशिएशन (जिंदा) आणि शासनाच्या विविध विभागाच्या अधिका?्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी महसूलमंत्री बोलत होते. बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व चंद्रा, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक अनिल कवडे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव, एमआयडीसीचे नाशिक येथील अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे उपस्थित होते.
जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ येथील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्या कामासाठी धुळे येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयात वारंवार जावे लागत आहे. त्या अनुषंगाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्योजकांनी केलेल्या मागणीनुसार धुळे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी धुळे आणि जळगाव येथे आलटून पालटून एक- एक आठवडा थांबावे अशा सूचना दिल्या.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथील उद्योगांसाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष प्रोत्साहन योजना सुरु केली होती. त्यानुसार येथील उद्योगांना वीज देयकांमध्ये प्रतियुनिट २ रुपये अनुदान दिले जात होते. पण काही कारणास्तव सध्या उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना फक्त ५० पैसे अनुदान प्रतियुनिट देण्यात येत आहे. जिंदा संघटनेने केलेल्या मागणीनुसार हे अनुदान पुन्हा २ रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणने तयार करावा, असे आदेश पाटील यांनी दिले.