‘गोंदिया’वरून नोटीस
By admin | Published: July 19, 2015 01:44 AM2015-07-19T01:44:53+5:302015-07-19T01:44:53+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी करणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
मुंबई : गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी करणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर आपली बाजू मांडली.
प्रदेश काँग्रेसने अग्रवाल यांना रीतसर कारणे दाखवा नोटीस बजावली असून भाजपासोबत केलेल्या युतीबाबत मंगळवारपर्यंत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. चव्हाण यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अग्रवाल यांनी भाजपासोबत जाण्याची घेतलेली भूमिका प्रदेश काँग्रेसला मान्य नाही. ही युती तोडण्यास अग्रवाल यांना आज सांगितले का, या प्रश्नात चव्हाण म्हणाले की, पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना नोटीस बजावली असून उत्तर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल.प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला अध्यक्षपद द्यावे, ही भूमिका घेतली होती. ती आम्हाला मान्य नव्हती. जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व राहावे म्हणून हा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी सांगितल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)