गोरक्षकप्रकरणी हायकोर्टाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:50 AM2017-08-08T03:50:38+5:302017-08-08T03:51:13+5:30
गोमांस बाळगल्याच्या किंवा खात असल्याच्या संशयावरून, स्वयंघोषित गोरक्षकांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोमांस बाळगल्याच्या किंवा खात असल्याच्या संशयावरून, स्वयंघोषित गोरक्षकांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
हेल्पलाइन व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या परिसरातील गोरक्षकांची यादीही उपलब्ध असावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते शदाब पटेल यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली.
केवळ गोमांस बाळगल्याच्या, खाल्ल्याच्या किंवा विक्री करण्याच्या संशयावरून, राज्यात अनेक ठिकाणी स्वयंघोषित गोरक्षकांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला आहे. बकरी ईदच्या काळात हे हल्ले वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील गोरक्षकांची यादी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.