पालिकेने तबेला मालकांना पाठवल्या नोटीस
By admin | Published: May 21, 2016 05:38 AM2016-05-21T05:38:50+5:302016-05-21T05:38:50+5:30
पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो, कावीळ असे आजार वाढतात.
मुंबई : पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो, कावीळ असे आजार वाढतात. गेल्या वर्षी मुंबईत लेप्टो अचानक वाढला होता. पावसाळा सुरू झाल्यावर आजारांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिका मे महिन्यातच कामाला लागली आहे. मुंबईतील तबेला मालकांना त्यांनी नोटीस पाठविली असून गाय, म्हैस यांचे उपचार करून घेण्यास सांगितले आहेत. त्याचबरोबर मलेरियाला आळा घालण्यासाठी डास उत्पत्तीक्षेत्रांचा शोध सुरू केला असल्याची माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.
गेल्या वर्षी पावसाळ्यात लेप्टोचे १८ बळी गेले होते. त्यानंतर लेप्टो का वाढला, याचे संशोधन पालिकेने केले होते. या संशोधनात लेप्टो हा
फक्त उंदरांमुळे नाही, तर गाय, म्हैस, डुक्कर आणि कुत्रा यांच्यामुळेही होऊ शकतो असे निदर्शनास आले
होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लेप्टोला आळा घालण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत पालिकेने मुंबईतील तबेला मालकांची बैठक घेतली होती. त्यात त्यांना प्राण्यांचे उपचार करून घ्या, असे सांगण्यात आले होते. प्राण्यांचे फक्त लसीकरण करून उपयोगाचे नाही. त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच पावसाळ्याआधी प्रत्येक तबेला मालकाने प्राण्यांवर उपाचर करून घेतल्याचा दाखला महापालिकेकडे द्यायचा आहे. तर पाळीव
कुत्र्यांवरही उपचार करून घेण्यास त्यांच्या मालकांना कळवण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. पाणी साचण्याची ठिकाणे शोधून काढली आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे.
खासगी क्षेत्रातही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर स्वच्छता
केली की नाही, याचीही पाहणी केली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये येथील
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे डॉ. केसकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची १ ते १५ जून दरम्यान तपासणी करून घ्या, असे पालिकेने आदेश दिले आहेत. तिथल्या कामगारांना मलेरिया अथवा डेंग्यू झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.