महाडमध्ये इमारत खाली करण्याची नोटीस
By admin | Published: July 18, 2016 03:02 AM2016-07-18T03:02:04+5:302016-07-18T03:02:04+5:30
शहरातील कातारी मोहल्ला येथील अमिना कॉम्प्लेक्स या रहिवासी संकुलातील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
महाड : शहरातील कातारी मोहल्ला येथील अमिना कॉम्प्लेक्स या रहिवासी संकुलातील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
तीन-चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने स्लॅबचे तसेच भिंतीचे प्लास्टर निखळून पडत आहे. तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर सदरची इमारत धोकादायक स्थितीत असल्याने नगर परिषद प्रशासनाने विकासासह इमारतीमधील फ्लॅटधारक रहिवाशांना नोटिसीद्वारे कळवले आहे.
अमिना कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी सदरची इमारत धोकादायक असल्याची तक्रार केली होती. काल या इमारतीची नगर अभियंता शशिकांत दिघे यांनी पाहणी केल्यानंतर इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. इमारतीची बांधकाम परवानगी निसार हुसैनामिया हवालदार यांच्या नावे असून बांधकाम परवानगीमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचा निष्क र्ष नगर परिषद प्रशासनाने काढला आहे. या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. या इमारतीच्या तळमजला व पहिल्या मजल्यावरील स्लॅब व भिंतींना तडे गेले असून राहण्यासाठी ही इमारत धोकादायक बनल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरलेली आहे. (वार्ताहर)