वैद्यकीय शिक्षण संचालकांना नोटीस
By admin | Published: January 17, 2016 02:25 AM2016-01-17T02:25:06+5:302016-01-17T02:25:06+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे, दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे, दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. पी.आर. बोरा यांनी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिंगारे आणि सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला.
वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी अनियमितता होऊ नये, पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलून इतरांना प्रवेश दिले जाऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश आहेत. त्यांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात ‘अवमान याचिका’ दाखल करण्याची मुभा आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या एमएचसीईटी २०१५ या सामायिक परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण संचालकांनी २२ सप्टेंबर २०१५ रोजी राज्यातील रिक्त जागांची परिस्थिती, संबंधित महाविद्यालयांची नावे, प्रवेश पद्धती जाहीर केली. २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत होती. अंकिता चव्हाणला एमएचसीईटीमध्ये १६१ गुण मिळाले होते. तिने २४ सप्टेंबरला सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केला.
२६ सप्टेंबरला संचालकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात १६४ गुण प्राप्त केलेल्या माधुरी जाधवचे नाव जाहीर केले, परंतु तिने त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला नसल्याने ती जागा रिक्त राहिली.
त्या जागेवर गुणवत्तेनुसार १६१
गुण प्राप्त केलेल्या अंकिताऐवजी जी विद्यार्थिनी प्रवेश प्रक्रियेत सहभागीच झाली नाही, अशा रोहिणी राठोडला प्रवेश दिला, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
तक्रार केली पण दखल नाही
- अंकिताने या संदर्भात ३० सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे तक्रार केली, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून अंकिताने अॅड. सुनील विभुते यांच्यामार्फत खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. याचिकेची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.