अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटिसा
By admin | Published: May 17, 2016 04:12 AM2016-05-17T04:12:05+5:302016-05-17T04:12:05+5:30
जोशीबाग परिसरातील आशीर्वाद या जीर्ण झालेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले
कल्याण : जोशीबाग परिसरातील आशीर्वाद या जीर्ण झालेल्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यास सुरूवात झाली आहे. तातडीने घरे रिकामी करा, अन्यथा दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, अशा सूचना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पुन्हा जोशीबागेतील एका इमारतीत छताचे प्लॅस्टर कोसळले.
धोकादायक इमारतींचा यंदाचा आकडा ६८६ असून यात २८९ इमारती या अतिधोकादायक आहेत. संबंधित इमारतींना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार दरवर्षी पार पाडले जातात. जीर्ण अवस्थेतील इमारती तातडीने तोडा, असे आदेशही जारी केले जातात. परंतु यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)
>नागरिकांची भूमिका, प्रशासनाचा ढिलेपणा येतो कारवाईच्या आड
जोशी बागेतील आशीर्वाद इमारतीची गॅलरी कोसळल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जीर्ण अवस्थेतील इमारतींचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या आठ प्रभागांपैकी सर्वात जास्त धोकादायक बांधकामे कल्याणमधील क प्रभागात आहेत. तेथे २१४ बांधकामे धोकादायक असून यातील १३४ बांधकामे अतिधोकादायक आहेत. मोठ्या प्रमाणावर रहिवाशी असलेल्या ठिकाणी कारवाईत अडचणी येत आहेत. काही बांधकामांचे वाद न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईला मर्यादा आहेत. तीन महिन्यात येथील दोन इमारती तोडल्या, तर महिनाभरात जीर्ण अवस्थेतील चार ते पाच इमारतींवर हातोडा चालवला जाणार आहे.