मृत व्यक्तीला अतिक्रमण थांबविण्याची दिली नोटीस
By admin | Published: October 31, 2016 02:40 AM2016-10-31T02:40:32+5:302016-10-31T02:40:32+5:30
दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे.
नवी मुंबई : दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. २४ तासामध्ये अनधिकृत बांधकाम स्वत: निष्कासित करा, अन्यथा महापालिका बांधकाम पाडेल व खर्च तुमच्याकडून वसूल करेल असा इशाराही देण्यात आला आहे. मृत व्यक्तीला दिलेल्या नोटीसमुळे पालिका प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
नेरूळ गावामध्ये राहणाऱ्या संजय पाटील यांनी त्यांचे मोडकळीस आलेले घर पाडून नवीन बांधकाम केले आहे. महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांनी २७ आॅक्टोंबरला त्यांच्या घरावर अनधिकृत बांधकामाची नोटीस चिटकविली आहे. ही नोटीस पाहून महापालिका प्रशासनाविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडको व राज्य शासनाने २०१२ पर्यंतची घरे नियमीत करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. पण प्रत्यक्षात गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत करण्याऐवजी त्यांच्यावर हातोडा टाकण्यास सुरुवात झाली आहे. मूळ गावठाणांमध्ये अतिक्रमण विभागाकडून नोटीस देण्यास सुरवात झाली आहे. नेरूळच्या विभाग अधिकारी संध्या अंबादे यांनी बाळकृष्ण शंकर पाटील यांच्या नावाने नोटीस काढली आहे. महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम करण्यात येत आहे. नोटीस मिळताक्षणी अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे व २४ तासामध्ये पुर्ण बांधकाम हटविण्यात यावे. पालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण विभागाकडून इमारतीचे बांधकाम पाडण्यात येईल व पूर्ण खर्च वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे. याशिवाय कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
बाळकृष्ण पाटील यांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटीसची तंतोतंत अंमलबजावणी करावी. चोवीस तासामध्ये पाटील यांनी स्वत: बांधकाम पाडले नाही तर पालिकेने इमारत पाडून खर्च मृत व्यक्तीकडून वसूल करावा अशी उपरोधीक टीका केली जात आहे. पालिका प्रशासन डोळे झाकून काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष
दिवाळीमध्येच महापालिकेनेमुळे गावठाणांमध्ये नोटीस पाठविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. सण, उत्सव आला की जाणीवपुर्वक प्रकल्पग्रस्तांना डिवचले जात आहे. वडीलोपर्जीत घर मोडकळीस आल्यानंतर ते कोसळेपर्यंत वाट पहायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
>मृत चालकाची
केली होती बदली
पालिकेने आॅगस्टमध्ये तानाजी गायकवाड या मृत कर्मचाऱ्याची बदली केली होती. पत्र मिळताच तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजार व्हा अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अतिक्रमणाची नोटीस देवून मृत व्यक्तीच्या परिवरातील सदस्यांच्या भावना दुखविल्या आहेत.