महाजनकोसह तीन कोळसा कंपन्यांना नोटीस
By admin | Published: July 24, 2014 12:55 AM2014-07-24T00:55:13+5:302014-07-24T00:55:13+5:30
स्पर्धा अपिलीय लवादाचे अध्यक्ष व्ही. एस. सिरपूरकर (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) यांनी सामाजिक कार्यकर्ता अॅड. सुरेंद्र प्रसाद यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महाजनको व नागपुरातील
१४ आॅगस्टला उपस्थित राहण्याचे निर्देश
सोपान पांढरीपांडे - नागपूर
स्पर्धा अपिलीय लवादाचे अध्यक्ष व्ही. एस. सिरपूरकर (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती) यांनी सामाजिक कार्यकर्ता अॅड. सुरेंद्र प्रसाद यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महाजनको व नागपुरातील तीन कोळसा कंपन्यांना नोटीस बजावून १४ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोळसा कंपन्यांमध्ये नायर कोल सर्व्हिसेस, करमचंद थापर अँड कंपनी व नरेशकुमार अँड कंपनीचा समावेश आहे.
याचिकाकर्त्यानुसार, तिन्ही कोळसा कंपन्यांनी संघ स्थापन केला आहे. या कंपन्या महाजनको अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोळसा पुरवठा कंत्राटावर स्वत:च नियंत्रण मिळवितात.
या संघात अन्य कोणत्याही कंपनीला प्रवेश दिला जात नाही. प्रति टन ५५ ते ६५ रुपये वाढीव शुल्काकरिता कंत्राट बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा दर सध्याच्या बाजारभावापेक्षा दहापट आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाजनको या तीनच कंपन्यांना कंत्राट देत आहे. त्यासाठी निविदा मागविल्या जात नाहीत. यामुळे महाराष्ट्रात देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक वीजदर आहे. अशाप्रकारे तिन्ही कंपन्यांनी गेल्या २० वर्षांत सुमारे १००० कोटी रुपये कमावले आहेत. हा संघ स्पर्धा कायदा २००२ चे उल्लंघन करणारा आहे.
हा अवैध संघ संपविण्याची गरज असल्याचे याचिककार्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. चंद्रप्रकाश खरे व अॅड. राजुल श्रीवास्तव, तर भारतीय स्पर्धा आयोगाचे उपसंचालकांनी स्पर्धा आयोगातर्फे बाजू मांडली.