मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मात्र इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:15 AM2023-02-03T09:15:25+5:302023-02-03T09:16:10+5:30
Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या.
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र आयफोन वापरण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते असे वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून २०१९च्या निवडणुकांत फोन टॅप झाल्याविषयी अधिवेशनांदरम्यान विधानसभा अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार, नेते बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागल्याने ठाकरे गटाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. संवादासाठी अधिक सुरक्षित असलेला आयफोन वापरावा अशा सूचना थेट मातोश्रीवरून करण्यात आल्या.यावरून जोरदार चर्चाही रंगल्या, अखेर या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला.
काय म्हणाले दानवे?
अशा कोणत्याही सूचना नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते. एकमेकांना ही यंत्रणा निरोप देत असते. पण आम्ही त्याला घाबरत नाही. खुल्या दिलाने काम करतो. कोण नेते कुठे जातात, यावर नजर ठेवली जातेच. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत आहे. याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल क, हेच धंदे आहेत. मात्र याची भीती शिवसैनिकाच्या मनात नाही.
कुणीही गुन्हे दाखल करो, फोन रेकॉर्ड करो, याने आम्हाला फरक पडत नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून तसेच ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो. कुणाला हव्या असतील तर मी स्वतः माझ्या ऑडिओ क्लिप देतो, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे.