दोन रुग्णालयांना नोटीस
By admin | Published: December 19, 2014 04:43 AM2014-12-19T04:43:41+5:302014-12-19T04:43:41+5:30
चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळूनही ही बाब का कळवली नाही, अशी विचारणा करणारे पत्र भांडुप पोलिसांनी मुंबई
मुंबई : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळूनही ही बाब का कळवली नाही, अशी विचारणा करणारे पत्र भांडुप पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह व राजावाडी रूग्णालयाला धाडले आहे. या पत्रात संबंधीत डॉक्टरांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना पोलिसांन केली आहे. याप्रकरणी पोलीस संबंधीत डॉक्टरांचे जबाब नोंदवून घेणार आहेत.
भांडुप, तुलशेत पाडा परिसरातील माऊंट मेरी या खासगी शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर ९ डिसेंबरला बलात्कार झाला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या केसरीनंदन उपाध्याय(३२) याला गजाआड केले. आरोपी उपाध्यायला न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. दरम्यान, चिमुरडीने उपाध्यायने केलेल्या अत्याचाराची माहिती त्याच दिवशी कुटुंबियांना दिली होती. मात्र त्यांनी या घटनेची तक्रार पोलिसांना दिली नाही. वेदना होऊ लागल्याने कुटुंबियांनी या चिमुरडीला उपचारांसाठी भांडुपच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात नेले. तेथे घडलेली घटना सांगितली. तेथील डॉक्टरांनी कुटुंबियांना राजावाडी रूग्णालयात धाडले. तेथेही कुटुंबियांनी लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. राजावाडीतल्या डॉक्टरांनी उपचार करून मुलीला सोडून दिले. या दोन्ही रूग्णालयांनी ही बाब पोलिसांना कळवली नाही, असे भांडुप पोलिसांच्या तपासातून उघड झाली. त्यामुळे पोलिसांनी रूग्णालयांना पत्रव्यवहार करून पुढील कारवाई सुरू केली आहे. रूग्णालयांना पत्र धाडल्याच्या वृत्ताला भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रताप चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. चिमुरडीवर नागपाडा येथील पोलीस रूग्णालयात वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल उद्या हाती येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनीधी)