कोल्हापुरातील अनधिकृत ३१० धर्मस्थळांना नोटिसा
By admin | Published: November 23, 2015 01:03 AM2015-11-23T01:03:18+5:302015-11-23T01:03:47+5:30
शहरात खळबळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व शासकीय जागांवरील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजाविण्यात आल्याने शहरात खळबळ माजली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा कालबद्ध कृती कार्यक्रम करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळे नियमित करणे, स्थलांतरित करणे किंवा ही बांधकामे काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’ अनधिकृत धार्मिकस्थळे नियमित करणे वर्गवारीत १८० धार्मिकस्थळांचा समावेश आहे तर ‘ब’ अनाधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे काढणे वर्गवारीत १३० धार्मिकस्थळांचा समावेश आहे. या यादीमध्ये शहरातील प्रमुख मंदिरे, मस्जिद, चर्च यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.या नोेटिसीमुळे शहरात खळबळ माजली आहे. पंधरा दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निर्देशानसार औरंगाबादमध्येही काही धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली तर यावेळी औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजला होता तर गेल्या चार दिवसांपूर्वीच इचलकरंजी शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांची यादीही नगरपरिषदेने जाहीर केली आहे.
नियमितीकरणास पात्र
प्रमुख धर्मस्थळे
मंदिरे : १) बिनखांबी गणेश मंदिर, २) सरस्वती कृष्ण दत्त मंदिर (गंगावेश), ३) रावणेश्वर मंदिर (साठमारी), ४) राममंदिर, दत्त मंदिर (संभाजीनगर स्टँडसमोर). मस्जिद : १) केसापूर पेठ मस्जिद २) मणेर मस्जिद (महापालिकानजीक), ३) गवंडी मोहल्ला ४) बोहरा मस्जिद (शिवाजी रोड), मस्जिद (सदर बाजार) चर्च : १) कोईमतूर ट्रस्ट कौन्सिल चर्च (कनाननगर), २) ख्रिस्ती समाज चर्च (विक्रमनगर) जैन मंदिर : १) महावीर नगर (सम्राटनगर) २) राजारामपुरी तिसरी गल्ली ३) शाहूपुरी व्यापारी पेठ.
अपात्र प्रमुख धर्मस्थळे
मंदिरे : १) जाऊळाचा गणपती (रंकाळा टॉवर) २) स्वयंभू गणेश मंदिर (शारदा कॅफेनजीक, लक्ष्मीपुरी) ३) पितळी गणपती मंदिर (गव्हर्न्मेंट प्रेससमोर), ४) स्वामी समर्थ मंदिर (मार्केट यार्ड, शेतकरी संघ पिछाडीस), ५) पंत-दत्त मंदिर (माऊली पुतळाशेजारी), ६) सागर देव मंदिर (वि. स. खांडेकर विद्यालय). मस्जिद : १) मस्जिद - वाय. पी. पोवार नगर मस्जिद (वाय. पी. पोवार नगर), शामराव अड्डालगत मस्जिद (नागाळा पार्क), सन्नत जमात मस्जिद (विक्रमनगर). मदरसा : अलिक अंजूमन मदरसा (लक्षतीर्थ वसाहत). दर्गा : लोणार वसाहत दर्गा (लोणार वसाहत रूळाजवळ). तुरबत : तुरबत चौक (मंगळवार पेठ), सुभाष रोड (पिसे बॅटरी सेंटरनजीक), सिद्धार्थनगर कमानीजवळ, विकास हायस्कूलजवळ.
परवाना, हरकतींसाठी महिन्याची मुदत
अनधिकृत धार्मिकस्थळे कायम करण्यासाठी एक महिन्यात परवानगी घेणे आवश्यक आहे, तर बांधकामे काढून टाकण्याच्या वर्गवारीतील धार्मिकस्थळांबाबत हरकती घेण्यासाठी एक महिन्याची मुभा देण्यात आलेली आहे. महिन्यात संबंधित धार्मिकस्थळांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास अशी धार्मिक स्थळांची बांधकामे काढून टाकली जाणार आहेत.