दानवे, मुंडेंच्या कारखान्यांसह १६ कारखान्यांना नोटिसा
By admin | Published: January 16, 2015 05:59 AM2015-01-16T05:59:00+5:302015-01-16T05:59:00+5:30
मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना साखर कारखानदारांनी पिळवणुकीचे धोरण सुरूच ठेवले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना साखर कारखानदारांनी पिळवणुकीचे धोरण सुरूच ठेवले आहे. विभागात एकूण २३ कारखाने सुरू असून, त्यापैकी १६ कारखान्यांकडून उसाला निर्धारित शासकीय दरानुसार भाव देण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ. राजेश टोपे, आ. अमरसिंह पंडित यांच्या कारखान्यांसह आजी-माजी मंत्री आणि आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद विभागात एकूण ४८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदा २३ कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. यापैकी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव न देणाऱ्या १६ कारखान्यांना साखर उपसंचालकांनी नोटिसा दिल्या आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्णातील वैद्यनाथ, जयभवानी आणि माजलगाव या सहकारी, येडेश्वरी आणि एनएसएल खाजगी, जालना जिल्ह्णातील समर्थ युनिट-१ आणि २, समृद्धी श्रद्धा एनर्जी, रामेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धेश्वर, संत एकनाथ सहकारी, बारामती अॅग्रो, मुक्तेश्वर खाजगी, जळगावमधील मधुकर, चोपडा, नंदुरबार -आॅस्टोरिया या साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे नोटीस दिलेल्या कारखान्यांचे संचालक आणि मालक काही आजी-माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत. साखरसम्राटांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे धोरण कायम ठेवल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. कारखान्याचे संचालक आणि मालकांविरुद्ध शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)